भारतीय शहरांवर तुर्कीच्या ड्रोनने हल्ले केल्यानंतर भारताच्या संभाव्य प्रतिहल्ल्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी इस्लामाबाद आपल्या हवाई क्षेत्राचा ढाल म्हणून वापर करत होता. ८ मे रोजी पाकिस्तानने सुमारे ३००-४०० ड्रोनद्वारे भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागांतील शहरांना लक्ष्य केले होते. तथापि भारताने विमानतळ आणि हवाई तळांसह महत्त्वपूर्ण ठिकाणांवर हल्ले करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न यशस्वीरित्या हाणून पाडले होते.
advertisement
भारताचा पाकिस्तानवर गंभीर आरोप
शुक्रवारी 'ऑपरेशन सिंदूर' संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पाकिस्तानच्या धोरणावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, ७ मे रोजी सायंकाळी ८:३० वाजता पाकिस्तानने ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ला करूनही आपले नागरी हवाई क्षेत्र बंद केले नव्हते. भारतावरील हल्ल्याला वेगवान हवाई संरक्षण प्रतिसाद मिळेल हे माहीत असूनही पाकिस्तान नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर करत आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळून उडणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानांसह, काहीही कल्पना नसलेल्या नागरी विमानांसाठी हे धोकादायक आहे.
भारताचा मोठा प्रतिहल्ला: इस्लामाबाद, लाहोर, रावळपिंडीसह 3 हवाई तळांवर धमाका
विंग कमांडर सिंग यांनी पुढे सांगितले की, आम्ही नुकताच दाखवलेला स्क्रीनशॉट पंजाब सेक्टरमधील उच्च हवाई संरक्षण सतर्कतेच्या परिस्थितीत 'फ्लाईट रडार २४' या ॲप्लिकेशनचा डेटा दर्शवतो. आम्ही घोषित केलेल्या बंदीमुळे भारतीय बाजूचे हवाई क्षेत्र नागरी हवाई वाहतुकीपासून पूर्णपणे रिकामे आहे. तथापि कराची आणि लाहोर दरम्यानच्या हवाई मार्गावर नागरी विमाने उड्डाण करत आहेत. भारतीय हवाई दलाने आंतरराष्ट्रीय नागरी विमानांची सुरक्षा निश्चित करण्यासाठी प्रचंड संयम दाखवला.
वाढता तणाव
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिक ठार झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी (७ मे) पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी तळांवर अचूक हल्ले केले होते. ज्यानंतर दोन्ही शेजारी राष्ट्रांमधील तणाव अधिकच वाढला आहे. ताज्या वृत्तानुसार पाकिस्तानने पहाटे ३:१५ पासून दुपारी १२ वाजेपर्यंत आपली हवाई हद्द बंद ठेवली आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताने नूर खान, मुरीद आणि रफीकी या तीन हवाई तळांना लक्ष्य केल्याचा दावा केला आहे. मात्र सर्व मालमत्ता सुरक्षित असल्याचेही म्हटले आहे. भारताने यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
