तेहराण/नवी दिल्ली: मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाचा थेट फटका भारतातून पश्चिम देशांकडे जाणाऱ्या विमानप्रवासाला बसू लागला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव अनेक आंतरराष्ट्रीय आणि भारतीय एअरलाइन्सनी इराण आणि इराकच्या हवाई क्षेत्रातून उड्डाणे थांबवली आहेत. परिणामी प्रवासाचा कालावधी वाढणार असून काही उड्डाणे रद्द करण्याची वेळ एअरलाइन्सवर आली आहे.
advertisement
बुधवार-गुरुवारच्या रात्री अचानक इराणचे हवाई क्षेत्र काही काळासाठी बंद झाल्याने एअर इंडियाला गुरुवारी सकाळची दिल्ली-न्यूयॉर्क (JFK), दिल्ली-न्यूआर्क आणि मुंबई-न्यूयॉर्क ही उड्डाणे रद्द करावी लागली. या उड्डाणांच्या परतीच्या फेऱ्याही रद्द झाल्या.
इंडिगोची बाकू-दिल्ली उड्डाण गुरुवारी पहाटे कॅस्पियन समुद्र ओलांडल्यानंतर इराणच्या हवाई क्षेत्रात प्रवेश करणार होती. मात्र परिस्थिती बदलल्याने हे विमान अवघ्या तासाभरात पुन्हा अझरबैजानची राजधानी बाकूकडे वळवण्यात आले. पुढील काही दिवसांत इंडिगो अल्माटी, ताश्कंद आणि बाकू मार्गांबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. कारण इराण-इराक टाळल्यास भारतापर्यंतचा मार्ग इतका लांबेल की जॉर्डनसारख्या ठिकाणी इंधन भरण्यासाठी थांबा घ्यावा लागू शकतो.
फ्लाइटरडार24 या विमान ट्रॅकिंग प्लॅटफॉर्मने गुरुवारी पहाटे 3.49 वाजता (IST) एक्सवर पोस्ट करताना सांगितले की, इंडिगोचे 6E1808 हे त्या क्षणी इराणच्या हवाई क्षेत्रात असलेले शेवटचे गैर-इराणी प्रवासी विमान होते.
दरम्यान इराणच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने जारी केलेल्या NOTAM (नोटिस टू एअरमेन) मध्ये सुरुवातीला तेहरान फ्लाइट इन्फॉर्मेशन रीजन सर्व उड्डाणांसाठी बंद असल्याचे नमूद करण्यात आले होते. नंतर “सामान्य सेवा पुन्हा सुरू” असल्याचा सुधारित आदेश देण्यात आला असला, तरीही अनेक एअरलाइन्सनी खबरदारी म्हणून हा मार्ग टाळण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.
एअर इंडियाने सोशल मीडियावर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इराणमधील परिस्थिती आणि हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे आमची काही उड्डाणे पर्यायी मार्गाने वळवली जात आहेत. त्यामुळे विलंब होऊ शकतो. काही मार्गांवर वळवणे शक्य नसल्याने उड्डाणे रद्द केली जात आहेत. प्रवाशांनी विमानतळावर निघण्यापूर्वी आपल्या उड्डाणाची स्थिती तपासावी.
युरोपियन एअरलाइन्स लुफ्थान्सानेही इराण आणि इराकचे हवाई क्षेत्र पुढील आदेश येईपर्यंत टाळण्याचा निर्णय घेतला आहे. इस्रायलमधील तेल अवीव आणि जॉर्डनमधील अम्मानसाठीची उड्डाणे मर्यादित कालावधीसाठी फक्त दिवसाच्या वेळेतच चालवली जात असून काही फेऱ्या रद्द होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे.
दरम्यान ओस्प्रे फ्लाइट सोल्युशन्सच्या 11 जानेवारीच्या अहवालानुसार, इराणमधील प्रमुख शहरांतील सुरक्षा परिस्थिती अस्थिर असून ती वेगाने बदलू शकते. विमानतळांवरील कर्मचारी आंदोलनात सहभागी होणे, इंधन तुटवडा आणि विमानतळ परिसरात निदर्शने होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही अहवालात नमूद आहे.
एकूणच मध्यपूर्वेतील घडामोडींचा परिणाम जागतिक हवाई वाहतुकीवर दिसू लागला असून, भारत-पश्चिम देशांदरम्यानचा विमानप्रवास पुढील काही काळ अधिक लांब आणि अनिश्चित राहण्याची चिन्हे आहेत.
