सध्या अमेरिकेत भारतीय वंशाचे अनेक लोक मोठ्या संख्येने राहतात. इतकंच नाही तर भारतीय वंशाच्या लोकांनी तिथल्या राजकारणावरही प्रभाव टाकायला सुरुवात केली आहे. या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी भारतीय वंशाच्या मतदारांना आकर्षित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. योगायोग म्हणजे, या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस या स्वत: मूळ भारतीय वंशाच्या आहेत. त्यांची आई भारतीय होती.
advertisement
याशिवाय, माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचे रनिंग मेट आणि उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार जेडी वॅन्स (JD Vance) यांच्या पत्नी उषा वॅन्स या देखील भारतीय वंशाच्या आहेत. त्या मूळच्या आंध्र प्रदेश राज्यातील आहेत. राष्ट्रपती पदाच्या दोन्ही उमेदवारांची भारताशी असलेल्या संबंधांवर काम करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे.
चीनकडून धोका आणि भारत-अमेरिका संबंध
सध्या भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांमध्ये चीन हा महत्त्वाचा घटक आहे. अमेरिका चीनला धोकादायक मानत आहे. माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या मागील कार्यकाळात चीनबाबत आक्रमक धोरण स्वीकारलं होतं. अमेरिकेला चीनकडून सामरिक धोका असल्याचं ट्रम्प म्हणाले होते. अशा स्थितीत चीनचं असलेलं आव्हान लक्षात घेता अमेरिकेसाठी भारतासोबतचे संबंध अधिक महत्त्वाचे ठरतात. असं मानलं जात आहे की, जर ट्रम्प जिंकले तर ते चीनबाबत कडक धोरणाचा अवलंब करतील. ट्रम्प यांच्या कार्यकाळात चीन प्रतिकार करण्यासाठी 2017 क्वॉड तयार करण्यात आला होता. या क्वॉडमध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, भारत आणि अमेरिका यांची समावेश आहे.
कमला हॅरिस विजयी झाल्यास त्या सध्याच्या जो बायडन सरकारची धोरणं पुढे नेतील अशी शक्यता आहे. जो बायडन सरकारमध्ये कमला उपराष्ट्रपती आहेत. बायडन यांनीही चीनबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. पण, त्यांनी ट्रम्प यांच्याप्रमाणे जास्त आक्रमक धोरण स्वीकारलं नाही. पण, 2020 मध्ये राष्ट्रपती झाल्यानंतर बायडन यांनी क्वाडचं धोरण पुढे नेलं होतं.
इमिग्रेशन
बेकायदेशीर इमिग्रेशन हा अमेरिकन निवडणुकीतील मोठा मुद्दा आहे. याबाबत ट्रम्प यांचं धोरण अतिशय कडक आहे. बेकायदेशीर इमिग्रेशन समूळ नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं ट्रम्प म्हणाले आहेत. कमला हॅरिस देखील आपल्या निवडणूक प्रचारात बेकायदेशीर स्थलांतराच्या विरोधात भरभरून बोलत होत्या. सध्या भारतातील अनेक लोक बेकायदेशीरपणे अमेरिकेत जात आहेत. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेने गेल्या एका वर्षात तिथे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सुमारे 1100 भारतीयांना भारतात पाठवलं आहे.
टेरिफ
ट्रम्प यांच्या विजयामुळे भारत-अमेरिकेतील संबंधांमध्ये टेरिफच्या मुद्द्यावरून वाद वाढू शकतो. ट्रम्प यांनी या पूर्वीच्या कार्यकाळात भारताला उघडपणे सांगितलं होतं की, भारत अमेरिकन वस्तूंवर जास्त आयात शुल्क लादतो. त्यामुळे अमेरिकेतून भारतात होणारी निर्यात कमी होते. त्यांनी हार्ले डेव्हिडसन बाईकचा उल्लेख केला होता. असं मानलं जात आहे की, ट्रम्प पुन्हा सत्तेवर आल्यास ते पुन्हा 'अमेरिका फर्स्ट' हे धोरण स्वीकारतील. अमेरिकन वस्तूंवर जास्त आयात शुल्क लादणाऱ्या देशांना अद्दल घडवणार असल्याचंही ट्रम्प बोलतात. त्यांचं मुख्य टार्गेट चीन आहे. अमेरिकेकडून होणाऱ्या आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीन जास्त आयात शुल्क लावतो. या उलट चीनमधून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निर्यात होते.
मानवी हक्क
मानवी हक्क हा देखील दोन्ही देशांमधील सर्वांत ज्वलंत मुद्दा आहे. अमेरिका स्वत:ला मानवी हक्क आणि लोकशाहीचा अग्रदूत मानतो. राष्ट्रपतिपदाच्या दोन्ही उमेदवारांची या मुद्द्यावर मतं थोडी वेगळी आहेत. ट्रम्प हे मानवी हक्कांबाबत फारसे बोलत नाहीत. ते राष्ट्रपती असताना भारताने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केलं होतं. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं वक्तव्य खूपच संतुलित होतं. या उलट, कमला हॅरिस आणि त्यांचा डेमोक्रॅटिक पक्ष जगातील देशांना आणि नेत्यांना लोकशाही व मानवी हक्कांबाबत सल्ला देतात.
