अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर एक गंमत म्हणून चर्चा होत असते ती म्हणजे निकालानंतर शपथ घेईपर्यंत राष्ट्राध्यक्ष म्हणून जिंकलेली व्यक्ती तंदुरुस्त राहिल का? जिविताला धोका तर होणार नाही ना? काही बरं वाईट झालं तर या पदावर उपराष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार बसतो. गंमतीने या चर्चा होत असल्या तरी त्या गंभीरसुद्धा असतात.
लेम डक पीरियड
advertisement
डोनाल्ड ट्रम्प यांचे वय सध्या ७८ वर्षे आणि ४ महिने इतकं आहे. ट्रम्प हे अमेरिकेचे सर्वात वयस्क राष्ट्राध्यक्षसुद्धा ठरले आहेत. सध्याचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे निवडणूक जिंकले होते तेव्हा ७७ वर्षे वयाचे होते. अशा वयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे काहीही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर शपथ घेईपर्यंत ७५ दिवसांचा कालावधी असतो. या कालावधीला लेम डक म्हणजेच लंगडा बदक असं म्हटलं जातं.
लेम डक हा विचित्र असा कालावधी असून अमेरिकेत असं मानलं जातं की लेम डक पीरियडमध्ये त्यांचा निवडणूक जिंकलेला राष्ट्राध्यक्ष सुखरुप रहावा. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतही असंच मानलं जात आहे. या कालावधीत त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी किंवा इतर काही झालं आणि ते प्रशासन सांभाळण्याच्या स्थितीत नसतील तर उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांना राष्ट्राध्यक्षपदाची शपथ दिली जाईल. शपथ घेण्याआधी आतापर्यंतच्या इतिहासात तरी कोणत्याच राष्ट्राध्यक्षासोबत असं घडलेलं नाही. मात्र असं काही घडल्यास याबाबत तरतूद करून ठेवण्यात आलीय.
अमेरिकेत अनेकदा काही अपवादात्मक स्थितीत उपराष्ट्राध्यक्षांकडे राष्ट्राध्यक्षांची सूत्रे सोपण्यात आली आहेत. अमेरिकेच्या इतिहासात ९ वेळा असं घडलंय. यात बहुतांश वेळा राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू किंवा राजीनामा यामुळे असं करावं लागलं आहे.
अमेरिकेचे नववे राष्ट्राध्यक्ष विल्यम हॅरिसन फक्त ३१ दिवस पदावर होते. आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर उपराष्ट्राध्यक्षांना राष्ट्राध्यक्ष केलं होतं.जॅचरी आर्चर, वॉरेन हार्डिंग, फ्रँकलीन रुझवेल्ट यांचाही आजारपणामुळे मृत्यू झाल्यानंतर तत्कालीन उपराष्ट्राध्यक्षांकडे देशाची सूत्रे देण्यात आली होती. तर अब्राहम लिंकन, जेम्स गारफिल्ड, विल्यम मॅककिनले, जॉन एफ केनेडी यांच्या हत्या झाल्या होत्या. तेव्हाही उपराष्ट्राध्यक्षांना राष्ट्राध्यक्ष केलं होतं. तर रिचर्ड निक्सन यांना राजीनामा द्यावा लागल्यानं तेव्हा उपराष्ट्राध्यक्षांकडे सर्व कारभार सोपवण्यात आला होता.
