इस्रायलच्या संरक्षण दलाने माहिती दिली होती की, गाझामधील एका कारवाईत तीन अज्ञात दहशतवादी मारले गेले आहेत. त्यापैकी एक सिनवार असल्याची शक्यता आहे. तपास केल्यानंतर मृत्यू झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एकजण सिनवार असल्याची खात्री झाली आहे.
याह्या सिनवार हा 'हमास' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता. इस्रायलने इराणमध्ये बॉम्बस्फोटात हमासचा नेता इस्माईल हानिया मारलं तेव्हा सिनवार हमासचा प्रमुख बनला. 1962 मध्ये गाझा येथील एका निर्वासित छावणीत त्याचा जन्म झाला होता. तो फार लवकर हमासशी जोडला गेला होता. त्याने हमासच्या सिक्युरिटी विंगचं नेतृत्व केलं होतं. ही विंग इस्रायली खबऱ्यांना नष्ट करण्याचं काम करत होती.
advertisement
1980 च्या उत्तरार्धात त्याला इस्रायलमध्ये अटक करण्यात आली होती. इस्रायलसोबत काम करणाऱ्या 12 जणांच्या खूनाची कबुली त्याने दिली होती. यानंतर त्याला 'खान युनिसचा कसाई' हे नाव पडलं होतं. सिनवारला दोन इस्रायली सैनिकांच्या हत्येसह इतर गुन्ह्यांसाठी चार वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सिनवारला 2008 मध्ये ब्रेन कॅन्सरचं निदान झालं होतं. मात्र, डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर तो वाचला.
2011 मध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासने पकडलेल्या सैनिकांच्या बदल्यात 1000 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली होती. त्यामध्ये सिनवारचाही समावेश होता. 2016 मध्ये हमास कमांडर महमूद इश्तावीच्या हत्येमागे सिनवारचा हात होता, असं मानलं जातं. इस्रायलचं म्हणणं आहे की, सिनवारने हमासच्या आर्म्ड विंगचा प्रमुख मोहम्मद देईफसह 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर अचानक हल्ला करण्याची योजना आखली होती. यामध्ये 1200 इस्रायली मारले गेले होते.
सिनवारचं असं म्हणणं होतं की, सशस्त्र संघर्ष केल्यानंतरच पॅलेस्टाईनची निर्मिती होऊ शकते. 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर तो भुयारांत लपून बसला होता. सिनवारचा मागोवा घेणं फार कठीण होतं. कारण, तो कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरत नव्हता.
