लँड अँड ट्रान्सपोर्ट मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य जपानमधील मियाझाकी विमानतळावर हा बॉम्बस्फोट झाला. हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा जवळपास कोणतंही विमान नव्हतं. त्यामुळे या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
विमानतळाजवळच्या एव्हिएशन स्कूलमध्ये या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे. व्हिडिओमधील रेकॉर्ड झालेल्या दृश्यानुसार, स्फोट झाला तेव्हा डांबराचे तुकडे कारंज्याप्रमाणे हवेत उडाले होते. टॅक्सीवेमध्ये सुमारे 7 मीटर (यार्ड) व्यास आणि 1 मीटर (3 फूट) खोल खड्डा पडला. जपानी टेलिव्हिजनवर देखील हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.
advertisement
सेल्फ-डिफेन्स फोर्सेस आणि पोलिसांनी केलेल्या तपासणीत समोर आलेल्या माहितीनुसार, हा अमेरिकेत निर्मित बॉम्ब 500 पाउंड्सचा होता. त्याचा स्फोट होऊन तो नष्ट झाला आहे त्यामुळे त्याचा आता धोका नाही.
मुख्य कॅबिनेट सचिव योशिमासा हयाशी यांनी सांगितलं की, या स्फोटामुळे बुधवारी दुपारपर्यंत विमानतळावरील 80 हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, टॅक्सीवे एका रात्रीत दुरुस्त करण्यात आला आणि गुरुवारी सकाळी उड्डाणं पुन्हा सुरू झाली.
संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैन्याने टाकलेल्या अनेक बॉम्बचे स्फोट झाले नव्हते. या भागात आतापर्यंत असे अनेक बॉम्ब सापडले आहेत. युद्धादरम्यान स्फोट न झालेले शेकडो टन बॉम्ब जपानमध्ये गाडले गेले आहेत. काहीवेळा बांधकामांसाठी खोदकाम करताना ते सापडतात.
मियाझाकी विमानतळाची निर्मिती 1943 मध्ये झालेली आहे. शाही जपानी नौदलाचं उड्डाण प्रशिक्षण क्षेत्र म्हणून त्याचा वापर केला जात होता. याच ठिकाणाहून काही वैमानिकांनी आत्मघाती मोहिमांसाठी उड्डाण केलं होतं.
जगाच्या इतिहासामध्ये दोन महायुद्धे झाली. त्यातील दुसरं महायुद्ध जास्त विध्वंसक मानलं जातं. कारण, या महायुद्धात अणुबॉम्बचा पहिल्यांदा वापर झाला होता. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानमधील दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले होते. 6 ऑगस्ट 1945 रोजी पहिला अणुबॉम्ब हिरोशिमावर आणि 9 ऑगस्ट रोजी दुसरा बॉम्ब नागासाकीवर टाकण्यात आला होता.
Keywords -
