ही अंगावर काटा आणणारी घटना नॅशनल हायवेवरील टोल प्लाझावरची आहे. दुपारपर्यंत कडाक्याचं ऊन पडलं होतं. तापमान 43 डिग्रीपर्यंत गेलं असताना अचानक वातावरणात बदल झाला. सोसाट्याचा वारा सुटला, ढगांनी काळोख केला आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने टोलप्लाझावर आलेलं छत 7 सेकंदात उडालं.
राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील नौतापा भागात ही धक्कादायक घटना घडली. आसिंद, मंडलसह भिलवाडा जिल्ह्यात पावसानं जोरदार बॅटिंग केली. या पावसासोबत जोरदार वारे वाहत होते, ज्यामुळे टोल प्लाझाचे टिन शेडही उडून गेलं. भिलवाडा राष्ट्रीय महामार्गावरील जिवालिया गावाजवळील टोल प्लाझावर या जोरदार वाऱ्याचा परिणाम दिसून आला.
टोल प्लाझावर बसवलेलं टिन शेड जोरदार वाऱ्याने पत्त्यासारखं उडून गेलं. या घटनेमुळे तिथे उभे असलेले लोक घाबरले, परंतु ते वेळीच महामार्गापासून दूर लपले, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटनेमुळे महामार्गावर उभ्या असलेल्या सुमारे अर्धा डझन वाहनांच्या काचा फुटल्या आणि त्यांचे नुकसान झाले. मंडल आणि आसिंद परिसरात झालेल्या या जोरदार वारा आणि पावसामुळे केवळ हवामानावर परिणाम झाला नाही तर भिलवाडा जिल्ह्यातील लोकांना दिवसभराच्या उष्णतेपासून आणि आर्द्रतेपासूनही दिलासा मिळाला.