भागलपुर : सध्या विविध सरकारी शाळांमध्ये परिस्थिती सुधारत असल्याचे दिसत आहे. अनेक तरुण शिक्षक हे विद्यार्थ्यांना नवनवीन पद्धतीने शिकवत आहेत. अशा नवनवीन पद्धतींची मोठी चर्चा होत असते. अशीच एक घटना समोर आली आहे. एका शिक्षिकेच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे या शिक्षिकेची मोठी चर्चा होत आहे.
भागलपूरमधील या शिक्षिकेच्या शिकवण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थीच नव्हे तर शिक्षण विभागही मोहित झाला आहे. हेमलता चौहान असे या शिक्षिकेच नाव आहे. हेमलता या भागलपूरच्या नवगछिया येथील शाळेत शिक्षिका आहेत. त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचे खूप कौतुक केले जात आहे. तसेच जिल्हा शिक्षणाधिकारी यांनीही त्यांचे कौतुक केले.
advertisement
शिक्षिका हेमलता चौहान या ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवतात, ते सर्वांना आवडत आहे. त्या प्रत्येक दिवशी नवनवीन प्रयोग करुन अत्यंत आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांना शिकवतात. यामुळे विद्यार्थीही मन लावून अभ्यास करतात. हेमलता चौहान या भागलपूर जिल्ह्यातील नवगछिया नगरपरिषदेच्या फुलचंद मध्य विद्यालयाच्या शिक्षिका आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शिक्षिका विद्यार्थ्यांना सुरेल आणि विनोदी अंदाजात गाणे गाऊन गुड मॉर्निंग म्हणून शिकवत आहे. तसेच विद्यार्थीही आनंदाने शिकत आहेत. सोबतच्या शिक्षकांनी हेमतला यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे त्यांचे खूप कौतुक होत आहे. या शिक्षिका तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना जे शिक्षण देत आहेत, जे सरकारी शाळेत आठवीपर्यंतचे विद्यार्थी शिकतात.
सामूहिक शिक्षणात शिकतात विद्यार्थी -
याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी संजय कुमार यांनी सांगितले की, आम्हीही हा व्हिडिओ पाहिला आहे. हेमलता चौहान यांच्या शिकवण्याची पद्धत चांगली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिकायला सोपे जाते. तसेच त्यांना आनंदही येतो. असेच जर सर्व शाळांमध्ये शिक्षकांनी शिकवले तर विद्यार्थी लवकर शिकतील आणि अभ्यासातही त्यांचे मन लागेल. त्यांनी सांगितले की, समूहात शिक्षणात मुले चांगले शिकतात.
