आग्रा विभागात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रवाशांनी एका चहा विक्रेत्याकडून चहा घेतला आणि तो तोंडाजवळ नेला तर उग्र वास येऊ लागला. आजूबाजूच्या प्रवाशांनाही हा वास येत होता. प्रवाशांनी याबाबत रेल्वे कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली. उत्तर मध्य रेल्वेच्या आग्रा विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेकिंग पथकाची टीम ट्रेन क्रमांक 22182 गोडवाना एक्स्प्रेसची तपासणी करत होते. यावेळी लोकांनी चहाला दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. तपासणी पथकाने विक्रेत्याला पकडलं. त्यानंतर यामागील धक्कादायक सत्य समजलं.
advertisement
चहाच्या विचित्र वासाचं कारण काय?
ट्रेनमध्ये एक बेकायदेशीर साईड पॅन्ट्रीकार चालत होती. तीन जण गाड्यांमध्ये अवैध विक्री करताना आढळून आले. प्रवासी चहा प्यायचे तोपर्यंत ते पुढे जायचे आणि ट्रेन थांबली की लगेच खाली उतरायचे. त्यांना लगेच पकडण्यात आलं.
चौकशीत विक्रेत्यांनी सांगितलं की चहा कमी असताना ते घाण भरायचे, ज्यामुळे कधीकधी दुर्गंधी निर्माण होते. अवैध विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यात चहा-कॉफीची किटली, 60 पाण्याच्या बाटल्या, गुटख्याची पाकिटं आणि इतर वस्तू सापडल्या.
धावत्या गाड्यांमध्ये बेकायदेशीरपणे खाद्यपदार्थांची विक्री करताना विक्रेते पकडले गेले आहेत. हे विक्रेते रेल्वे प्रवाशांच्या असहायतेचा फायदा घेत त्यांना लक्ष्य करतात, त्यांना चेकिंग पथकाने रेल्वे सुरक्षा बल आग्रा कॅन्टोन्मेंटच्या ताब्यात दिलं. प्रवाशांनी अधिकृत विक्रेते आणि फेरीवाल्यांकडूनच खाद्यपदार्थ खरेदी करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ते योग्य गणवेशात येतात आणि त्यांची बॅच असते.
