अजमेर : आपण कधीकधी रागाने किंवा मस्करीत कोणाला रेडा म्हणतो. मात्र खरोखरच्या रेड्याला बाजारात किती भाव असतो, हे कळलं तर तुमचा तुमच्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वासच बसणार नाही. त्यात जर रेडा अति हट्टाकट्टा असेल तर काही विचारायला नको. त्याचा मालक कोट्याधीश झालाच म्हणून समजायचं.
राजस्थानात आंतरराष्ट्रीय पुष्कर पशू मेळाव्याची सुरुवात झाली आहे. अजमेरपासून 15 किलोमीटर अंतरावर हा मेळावा भरतो. येत्या 9 ते 15 नोव्हेंबरपर्यंत इथं विविध प्रजातींचे प्राणी विक्रीसाठी ठेवले जातील. विविध राज्यांमधील पशूपालक आपली गुरं घेऊन इथं येतात. सध्या याठिकाणी हरियाणाच्या 'अनमोल'चीच जोरदार चर्चा आहे. हा रेडा ग्राहक आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलाय. दररोज दूरदूरहून लोक खास या रेड्यालाच बघायला येतात.
advertisement
रोजचा खर्चे 1500 रुपये!
अनमोलचे मालक पलविंदर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुर्रा प्रजातीचा रेडा आहे. त्याचं वय आहे जवळपास 8 वर्षे. त्याचा खुराक एवढा भक्कम असतो की, त्याच्यासाठी दररोज साधारण 1500 रुपये खर्च होतात. तो फक्त ताजी फळं, काजू आणि बदामच खातो.
अनमोलची किंमत अव्वाच्या सव्वा!
पलविंदर सिंह यांनी सांगितलं की, 'अनमोलला प्रचंड मागणी येते. दररोज एकतरी ग्राहक त्याच्यासाठी विचारणा करतो. खरंतर मुर्रा प्रजातीच्या सर्वच रेड्यांना चांगली किंमत मिळते. त्यात अनमोल दिसायला रुबाबदार आणि ताकदवान आहे. त्यामुळे त्याची किंमत तब्बल 23 कोटी रुपये आहे. परंतु मी कधीच त्याला विकण्याचा विचार केलेला नाही किंवा भविष्यात कधी त्याला विकणारही नाही. कारण त्याला अगदी भावासारखं वाढवलं आहे. तो माझ्या कुटुंबाचा एक भाग आहे.' पलविंदर सिंह यांचं हे पशूप्रेम पाहून पर्यटक आणि ग्राहक अक्षरश: भारावून जातात.
अनमोलच्या शुक्राणूंना मोठी मागणी!
पलविंदर सिंह हे अनमोलला मोठी मागणी आणि कोट्यावधींची किंमत मिळत असूनही त्याची विक्री करत नाहीत. उलट तो आणखी रुबाबदार कसा दिसेल, सुदृढ कसा राहिल यासाठी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करतात. त्यांना दररोज दीड हजार रुपयांचा खर्च करावा लागतो, तरी ते अनमोलला मायेनं पाळतात. परंतु त्यातून त्यांची काहीच कमाई होत नाही असं नाहीये.
अनमोल हा पलविंदर सिंह यांना बक्कळ पैसे मिळवून देतो. कारण त्याच्या शुक्राणूंनाही बाजारात प्रचंड मागणी आहे. या प्रजातीचे आणखी रेडे आणि म्हशी जन्माला याव्या यासाठी त्याचे शुक्राणू खरेदी केले जातात. दरम्यान, अनमोलला खरेदी करता येत नाही, यामुळे ग्राहक निराश होतात. परंतु अनेकजण आवडीनं त्याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ काढतात.