सोलापूर – जर कुणी सांगितलं की. एका कोंबड्याची किंमत तब्बल 50 हजार रुपये आहे. तर आपला नक्कीच विश्वास बसणार नाही. परंतु, सोलापुरातील कृषी प्रदर्शनात एक कोंबडा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरतोय. बारामतीतील चोपडजचे शेतकरी यशराज घाडगे यांचा हा कोंबडा असून त्याची किंमत खरंच 50 हजार रुपये आहे. विषेष म्हणजे दिसायला अगदी रुबाबदार असणारा हा राजा कोंबड्याचं वजन देखील तब्बल 6 किलो आहे. त्यामुळे राजा कोंबडा पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनात मोठी गर्दी होत आहे.
advertisement
सोलापुरात 54 वे राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन 2024 भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात धिप्पाड रेडा, बैल, गाय असे प्राणी आकर्षणाचे केंद्र असतात. पण यंदा या प्रदर्शनात तब्बल 6 किलोचा राजा कोंबडा सर्वांचे लक्ष वेधत आहे. बारामती येथील चोपडजचे शेतकरी यशराज घाडगे यांचा हा कोंबडा असून त्याची उंची आणि वजन देखील इतर कोंबड्यांपेक्षा जास्त आहे. लहानपणापासूनच दिसायला देखणा असणारा राजा आता 12 महिन्यांचा झाल्याचं शेतकरी यशराज यांनी सांगितलं.
5 एकर जमीन विकली, पत्नीचे मंगळसूत्र गहाण ठेवले, सोलापुरातील प्रसाद बनला बेघरांचा सहारा
राजाचा खुराक कसा?
सर्वात मोठा कोंबडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजाचा खुराकही एखाद्या पैलवानाप्रमाणे आहे. रोज सकाळी मका भरडा, कोंबडी खाद्य, भुसा दिला जातो. तर दुपारी भुसा, तांदूळ, गहू, बाजरी हे धान्य दिले जाते. कोंबड्याला संध्याकाळच्या खुराकात दूध, भुसा, कोंबडी खाद्य दिले जाते. हा खुराक रोजचा असून त्यात खंड पडू दिला जात नाही, असे मालक यशराज यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितले.
50 हजारांना मागणी
दिसायला वेगळा, उंच, धिप्पाड असल्याने दुधाची बादलीत तोंड घालणे शक्य होत असे. त्यामुळे त्याला रोज दूध पिण्यासाठी ठेवण्यात येत होते. हा कोंबडा फार्ममध्ये एकटा राजासारखा फिरत होता. तसेच तो बाकी कोंबड्यांपेक्षा वेगळा असल्याने त्याला राजा असंच नाव देण्यात आलं. राजाला तब्बल 50 हजार रुपयांपर्यंत मागणी झाली. पण तो घरचा सदस्य झाला असून त्याला कितीही किंमत आली तरी विकणार नसल्याचं मालक यशराज घाडगे यांनी सांगितलं.