जालना शहरापासून साधारणपणे 40 ते 45 किमी अंतरावर जाफराबाद तालुक्यात गाडेगव्हाण हे गाव आहे. या गावात पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत दोन शिक्षक असून त्यापैकी एक असलेल्या विष्णू कडूबा मुंडे यांनी वर्गातच डूलकी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. खुर्चीवर बसून आणि टेबलावर पाय टाकून झोपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायल झाला. त्यामुळे या प्रकाराची सर्वत्र चर्चा होतेय.
advertisement
नेमकं घडलं काय?
“मी सकाळी नऊ वाजता माझ्या मुलाला अंगणवाडीमध्ये सोडण्यासाठी आलो होतो. त्यानंतर साडेअकरा वाजता त्याला परत घेण्यासाठी शाळेत आलो. तेव्हा शिक्षक वर्गात झोपल्याचा प्रकार माझ्या लक्षात आला. यानंतर हा प्रकार मी मोबाईल कॅमेरा मध्ये रेकॉर्ड केला. गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर टाकल्यानंतर हा प्रकार सगळीकडे व्हायरल झाला, असं व्हिडिओ रेकॉर्ड करणारे समाधान बनकर यांनी सांगितलं.
सरांनी आम्हाला शिवकलं
“सर सकाळी नऊ वाजता सर शाळेत आले होते. त्यांनी तीन विषय आम्हाला शिकवले. परंतु यानंतर त्यांनी एक गोळी घेतली आणि त्यांना जागेवरच झोप लागली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे सर तसेच झोपून होते, असं शाळेतील एका विद्यार्थ्याने लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.
शिक्षक गेल्या काही काळापासून आजारी
संबंधित शिक्षक हे बरेच दिवसापासून आजारी आहेत. जालन्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांना आठ दिवस ॲडमिट देखील करण्यात आलं होतं. सातत्याने आजारी राहत असल्याने आम्ही या शिक्षकाची बदली करावी किंवा दुसरा शिक्षक आमच्या शाळेला द्यावा, अशी मागणी देखील केली होती. सतत आजारी असल्याने त्यांना गोळ्या सुरू होत्या. त्यामुळे गोळी खाल्ल्यानंतर ते 10 मिनिटे तिथेच झोपल्याचं एका गावकऱ्यानं सांगितलं.