Guru Purnima 2025: गुरूविना नाही..! गुरुपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व, गुरुवारी नेमकं काय-काय करावं?

Last Updated:

Guru Purnima 2025: गुरुपौर्णिमेच्या दिवशी भक्त आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी विविध गोष्टी करतात. या दिवशी आपल्या आध्यात्मिक गुरुंना किंवा ज्यांनी तुम्हाला जीवनात मार्गदर्शन केले आहे, अशा गुरुसमान व्यक्तींना भेटून...

News18
News18
मुंबई : हिंदू धर्मात गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा मोठी आहे. गुरुपौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. गुरुपौर्णिमा आषाढ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला साजरी केली जाते. या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण या दिवशी महर्षी वेद व्यास यांचा जन्म झाला होता. महर्षी व्यासांनी चार वेदांचे संपादन केले, महाभारत लिहिले आणि भागवत पुराणाचे ज्ञान दिले, त्यामुळे त्यांना आद्यगुरू मानले जाते.
गुरुपौर्णिमेचे महत्त्व -  गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता, आदर आणि सन्मान व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे. गुरु हे आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतात. ते शिष्याला योग्य मार्ग दाखवून त्याचे जीवन घडवतात. या दिवशी गुरुतत्त्व (ईश्वरी तत्त्व) नेहमीच्या तुलनेत हजारो पटीने अधिक कार्यरत असते, असे मानले जाते. त्यामुळे गुरुपौर्णिमेला केलेली सेवा, पूजा आणि नामस्मरण अधिक फलदायी ठरते. गुरुंच्या पूजनाने आणि आशीर्वादाने ज्ञान आणि बुद्धीचा विकास होतो, असे मानले जाते. यामुळे आध्यात्मिक प्रगती होते आणि जीवनात सुख-शांती-समृद्धी येते.
advertisement
गुरु-शिष्य परंपरा: भारतीय संस्कृतीत गुरु-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यास-गणेश, वसिष्ठ-राम, कृष्ण-सांदिपनी, मच्छिंद्रनाथ-गोरक्षनाथ, निवृत्तीनाथ-ज्ञानदेव, रामदास स्वामी-शिवाजी महाराज यांसारख्या अनेक महान गुरु-शिष्यांच्या जोड्या या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करतात. गुरुपौर्णिमा ही या परंपरेचा सन्मान राखते. बौद्ध परंपरेनुसार, आध्यात्मिक साधनेने बोधी प्राप्त झाल्यानंतर गौतम बुद्धांनी सारनाथ येथे आपल्या शिष्यांना पहिले प्रवचन दिले, तो दिवस गुरुपौर्णिमेचा होता असे मानले जाते. त्यामुळे बौद्ध धर्मातही या दिवसाला विशेष महत्त्व आहे. 
advertisement
गुरुपौर्णिमेला काय करावे?
गुरुपौर्णिमेच्या दिवशी भक्त आपल्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी विविध गोष्टी करतात. या दिवशी आपल्या आध्यात्मिक गुरुंना किंवा ज्यांनी तुम्हाला जीवनात मार्गदर्शन केले आहे, अशा गुरुसमान व्यक्तींना भेटून त्यांचे चरणस्पर्श करावे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. गुरुंची पाद्यपूजा करावी. त्यांना फुले, फळे, वस्त्र (विशेषतः पिवळे वस्त्र) अर्पण करावे. गुरुदक्षिणा मनोभावे अर्पण करावी. ही केवळ भेटवस्तू नसून, गुरुंच्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल व्यक्त केलेली कृतज्ञता असते. पारंपरिक श्लोक "गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः, गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात परब्रह्म, तस्मै श्रीगुरवे नमः।।" याचा उच्चार करून गुरुंना वंदन करावे.
advertisement
व्यासपूजा: महर्षी व्यासांना आदयगुरू मानले जाते, म्हणून गुरुपौर्णिमेला व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. घरात व्यासपीठाची स्थापना करून त्यांची षोडशोपचारे पूजा केली जाते.
धार्मिक ग्रंथांचे पठण: गुरुचरित्र, भगवद्गीता, रामायण, किंवा अन्य धार्मिक ग्रंथांचे पठण करावे. गुरुचरित्र पारायण सप्ताह करणेही शुभ मानले जाते. आपल्या गुरुंनी दिलेल्या मंत्राचा किंवा गुरुमंत्राचा जप करावा. ध्यान करून आत्मचिंतन करावे. यामुळे मानसिक शांती मिळते. गुरुपौर्णिमेला दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. गरजू लोकांना पिवळ्या रंगाचे धान्य, मिठाई किंवा वस्त्रदान करावे. असे केल्याने आर्थिक लाभ आणि समाजात मान-सन्मान वाढतो असे मानले जाते. 
advertisement
गुरुपौर्णिमा २०२५:
यावर्षी गुरुपौर्णिमा गुरुवार, १० जुलै रोजी साजरी केली जाईल. गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नसून, तो आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुजनांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक महत्त्वाचा दिवस असतो.
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Guru Purnima 2025: गुरूविना नाही..! गुरुपौर्णिमेचे धार्मिक महत्त्व, गुरुवारी नेमकं काय-काय करावं?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement