वडिलांचं निधन अन् भावाने दिली खंबीर साथ, पावणे नऊ वर्षांच्या संघर्षांनंतर अखेर शुभांगी झाली फौजदार
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
वडिलांनी फौजदार होण्यासंदर्भात दाखवलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरची एक कन्या प्रयत्न करत होती. अखेर तिने यशाला गवसणी घालून पीएसआय होऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण करून दाखवले आहे.
साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी
कोल्हापूर : आपल्या भविष्यात आपण काय बनायचं याबाबतचे स्वप्न बरेच जण लहान वयात पाहत असतात. मात्र आपल्या वडिलांनी फौजदार होण्यासंदर्भात दाखवलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोल्हापूरची एक कन्या प्रयत्न करत होती. अखेर तिने यशाला गवसणी घालून पीएसआय होऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण करून दाखवले आहे. त्यामुळे सध्या सर्वांकडून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
advertisement
कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील कुशीरे गावात राहणाऱ्या राजाराम चव्हाण यांनी आपल्या मुलीने फौजदार व्हावे असे स्वप्न पाहिले होते. मात्र काळाने घाला केला आणि त्यांना 2013 साली जगाचा निरोप घ्यावा लागला. तेव्हापासून त्यांची मुलगी शुभांगी चव्हाण हिने तेच स्वप्न मनाशी बाळगले होते. अथक परिश्रम करून शेवटी तिने नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत यश मिळवून स्वप्नपूर्ती केली आहे. त्यातही कोणत्याच क्लासेसविना खुल्या प्रवर्गातून 18 वी रँक तिने मिळवली आहे.
advertisement
लहानपणाासून एकच ध्येय..
शुभांगीचे सर्व प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. तर माध्यमिक शिक्षण श्री नवनाथ हायस्कूल पोहाळे येथे झाले. पुढे तिने कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेज येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणी वडिलांनी दाखवलेली फौजदरकीची दिशा मात्र तिने सोडली नाही. स्वतः घरी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू असायची. यामध्ये वडिलांच्या निधनानंतर आई आणि भावाच्या अनमोल सहकार्यामुळेच हे यश मिळवू शकल्याच्या भावना शुभांगी हिने व्यक्त केल्या आहेत.
advertisement
भावाने दिली खंबीर साथ..
आपल्या वडिलांनी बहिणीसाठी पाहिलेल स्वप्न पूर्ण करायचं हेच ध्येय शुभांगीच्या भावाने देखील स्वतःपुढे ठेवले होते. त्यामुळेच वयाच्या 16 व्या वर्षी ऋषी चव्हाण याने स्वतःचे शिक्षण थांबवून बहिणीला आर्थिक पाठबळ आणि मानसिक आधार दिला. त्यामुळेच या यशासाठी वेळोवेळी प्रोत्साहन मिळत गेले. सोबतच सरदार भित्तम, संदीप नलावडे, प्रा. अक्षय चव्हाण, दीपक अतिग्रे यांचेही नेहमी मार्गदर्शन मिळाल्याचे देखील शुभांगीने सांगितले आहे.
advertisement
आजोबांचेही छत्र हरपले..
वडिलांच्या निधनानंतर शुभांगीच्या आजोबांनी तिला मायेचे छत्र दिले होते. मात्र शुभांगीची शारीरिक चाचणी अवघ्या 11 दिवसांवर असताना ऑगस्ट 2023 मध्ये त्यांचेही अचानक निधन झाले. तरीही शारीरिक चाचणीमध्ये आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवून शुभांगीने चांगली कामगिरी केली. याचाही अभिमान घरातील कुटुंबीयांना आहे.
advertisement
दरम्यान बहिण भावाने मिळून पावणे नऊ वर्षांचा संघर्ष संपवत वडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण केले आहे. शुभांगीने देखील मोठ्या प्रयत्नांती यश खेचून आणले असल्यामुळे तिच्यावर कुटुंबीय नातेवाईक मित्रमंडळी यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Location :
Kolhapur,Kolhapur,Maharashtra
First Published :
April 15, 2024 2:07 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
वडिलांचं निधन अन् भावाने दिली खंबीर साथ, पावणे नऊ वर्षांच्या संघर्षांनंतर अखेर शुभांगी झाली फौजदार