Zp School: महाराष्ट्रातील या झेडपी शाळेत प्रवेशासाठी लागते रांग, मोजक्याच विद्यार्थ्यांना मिळतो प्रवेश, काय आहे असं खास? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
विद्यार्थ्यांना शाळा म्हणजे ओझं न वाटता त्यांच्या आवडीचं एखादं ठिकाण वाटू लागलंय. परंतु एका तांड्यावरील शाळेला आयएसओ दर्जा मिळण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.
जालना: जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर गळणारी पत्रे, शाळांची झालेली दुरवस्था, शाळेमध्ये झोपणारे शिक्षक हे चित्र आठवतं. परंतु जालना जिल्ह्यातील पहिली आणि एकमेव आयएसओ मानांकन प्राप्त लालवाडी तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा आहेत. टॅबवर शिकणारे विद्यार्थी, प्रत्येक वर्ग खोलीमध्ये असलेला स्मार्ट बोर्ड, शाळेच्या परिसरामध्ये अभ्यास करणारी मुले, हसत खेळत शिक्षणाची संकल्पना या शाळेने सत्यात उतरवली आहे. विद्यार्थ्यांना शाळा म्हणजे ओझं न वाटता त्यांच्या आवडीचं एखादं ठिकाण वाटू लागलंय.
परंतु एका तांड्यावरील शाळेला आयएसओ दर्जा मिळण्यापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. या प्रवासात असंख्य अडीअडचणी आल्या परंतु त्या अडचणींवर आणि संकटांवर मात करत या शाळेने आणि शाळेतील शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने खाजगी शाळेपेक्षाही उत्तम सुविधा आणि चांगलं शिक्षण देण्याचा मापदंड तयार केलाय. यामुळेच या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी अक्षरशः रांगा लागतात.
advertisement
एका उत्तम शाळेसाठी ज्या पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण आवश्यक असते ते सर्व आमच्या शाळेत मिळत असल्याचे समाधान आहे. मी 2015 मध्ये जेव्हा या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू झालो तेव्हा जुन्या शाळेमध्ये अनेक सोयीसुविधांचा अभाव होता. गावकऱ्यांच्या सहकार्याने आम्ही गावाच्या बाजूला दोन नवीन वर्ग खोल्या बांधल्या. एका वर्ग खोलीसाठी जालना शहरातील अग्रवाल परिवाराने देखील सहकार्य केलं.
advertisement
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट बोर्ड, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बसण्याची स्वतंत्र व्यवस्था, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बाथरूमची व्यवस्था, स्वच्छ आणि सुंदर परिसर आणि हसत खेळत शिक्षण. यामुळे आमच्या शाळेत प्रवेशासाठी अनेक विद्यार्थी इच्छुक असतात. मी आलो तेव्हा या गावातून अनेक विद्यार्थी अंबडला खाजगी शाळेत शिक्षणासाठी जायचे. आता या गावातले या शाळेत केवळ 22 विद्यार्थी आहेत. तर राहिलेले 13 विद्यार्थी हे अंबड शहर आणि इतर गावातून शिक्षणासाठी इथे येतात. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं म्हणून आम्हीच आमच्या विद्यार्थ्यांची मर्यादा घालून घेतली आहे. या सर्व कामात सहशिक्षिका रत्नमाला नरवडे यांचं सहकार्य मिळालं, असं शाळेचे मुख्याध्यापक सचिन खिल्लारे यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.
advertisement
अनेक पालकांचा खाजगी शाळांकडे कल वाढतोय. याला जिल्हा परिषद शाळांमध्ये न मिळणाऱ्या पायाभूत सुविधा आणि निकृष्ट शिक्षण कारणीभूत आहे. परंतु जर लालवाडी येथील जिल्हा परिषद शाळांसारख्या पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं तर जिल्हा परिषदेच्या शाळांकडे देखील पालक तेवढ्या गांभीर्याने पाहतील एवढं मात्र नक्की.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
July 04, 2025 4:24 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
Zp School: महाराष्ट्रातील या झेडपी शाळेत प्रवेशासाठी लागते रांग, मोजक्याच विद्यार्थ्यांना मिळतो प्रवेश, काय आहे असं खास? Video