दहावी-बारावी बोर्डाचा निकाल 15 मे पर्यंत? बोर्डाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
SSC HSC Result: दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल यंदा लवकरच जाहीर होणार आहे. परीक्षेच्या उत्तर पत्रिका तपासणीचे काम अंतिम टप्प्यात असून 15 मेपर्यंत निकाल जाहीर होणार आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा अंतिम टप्यात आहे. या परीक्षा येत्या आठवड्यात संपणार असून या दोन्ही परीक्षांचा निकाल 15 मेपूर्वी जाहीर होणार आहे. शिक्षण विभागकडून निकाल मे महिन्यातच जाहीर होण्याच्या दृष्टीने उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम सुरु आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या इतिहासातील सर्वांत जलद निकाल यंदा जाहीर होण्याची शक्यता आहे.
यंदा बारावीचा निकाल साधारण 10 मेपर्यंत, तर दहावीचा निकाल 15 मेपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. राज्य मंडळाने दोन्ही परीक्षा लवकर घेण्यासोबतच त्यांचे निकाल जलद जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाढत्या संधी लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे पुरवणी परीक्षाही जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे.
advertisement
उत्तरपत्रिका तपासणीचे काम प्रगतिपथावर
राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरू आहेत. तसेच झालेल्या विषयांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम प्रगतिपथावर आहे. राज्य मंडळाकडून दोन्ही परीक्षांचे निकाल 15 मेपूर्वी जाहीर करण्यावर भर राहणार आहे. त्यादृष्टीने मंडळाची तयारी सुरू आहे, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने मे महिन्याच्या अखेरीस निकाल प्रसिद्ध होत आहे. मात्र, यंदा दोन्ही परीक्षा नेहमीपेक्षा दहा दिवस आधीच सुरू झाल्याने निकाल जाहीर होण्याची तारीख देखील अलीकडे आली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
March 13, 2025 8:18 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
दहावी-बारावी बोर्डाचा निकाल 15 मे पर्यंत? बोर्डाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडणार