फिरायला तिघे गेले परतले दोघेच, शेतात एकासोबत घडला धडकी भरवणारा प्रसंग
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime News: भंडारा जिल्ह्यातील सोनेगाव शिवारात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे.
भंडारा जिल्ह्यातील सोनेगाव शिवारात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका १८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी तीन मित्र शेतात फिरायला गेले होते. पण घरी दोघेच परतले. एकासोबत शेतात अनर्थ घडला. व्हिडीओ काढायच्या नादात तरुणाने जीव गमावला आहे. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी घटनास्थळी येत एकच आक्रोश केला.
तिर्थराज धनपाल बारसागडे असं मृत पावलेल्या १८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो भंडारा जिल्ह्यातील सोनेगावचा रहिवासी आहे. तो कोंढा येथील जागृती कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिकत होता. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तो गावातील दोघा मित्रांना घेऊन शेतात फिरायला गेला. आपल्या मित्रांसोबत सेल्फी काढून, मित्रांना व्हिडीओ बनवण्यास सांगितले.
यावेळी त्याने झाडावर चढून तलावाच्या पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न विफल ठरला. पाण्यात उडी मारताच त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या दोन मित्रांनी तातडीने याची माहिती गावकऱ्यांना दिली. पाहता-पाहता घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली.
advertisement
घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. फिरायला गेलेल्या तीन पैकी एका मित्रासोबत अशाप्रकारे अनर्थ घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रविवारी उशिरा स्थानिक स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात तिर्थराजवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Location :
Bhandara,Maharashtra
First Published :
July 07, 2025 12:14 PM IST