ऑनलाईन शॉपिंग पडली महागात, डिलिव्हरी बॉयनेच लंपास केले 10 लाखांचे गोल्ड कॉईन, नाशिकमधील धक्कादायक प्रकार
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Mohan Najan
Last Updated:
ग्राहकाची सोन्याची नाणी घरपोच करण्याऐवजी डिलिव्हरी बॉयनेच आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने 10 लाख रुपये किमतीच्या सहा सुवर्णमुद्रा लंपास केल्या आहेत.
नाशिक : ऑनलाइन शॉपिंगच्या विश्वासाला तडा देणारी एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. ग्राहकाची सोन्याची नाणी घरपोच करण्याऐवजी डिलिव्हरी बॉयनेच आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने 10 लाख रुपये किमतीच्या सहा सुवर्णमुद्रा लंपास केल्या आहेत. विशेष म्हणजे, तांत्रिक कौशल्याचा वापर करून ग्राहकाचा ओटीपी मिळवत पार्सल पोहोचवल्याचा बनाव त्याने रचला होता. याप्रकरणी सायबर पोलिसांनी संशयित प्रसाद राऊत आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नेमका प्रकार काय?
मुंबई येथील एका ग्राहकाने 9 लाख 87 हजार 130 रुपये किमतीची सहा सोन्याची नाणी कुरिअरद्वारे मागवली होती. ही नाणी नाशिकमधील एका नामांकित कुरिअर कंपनीच्या कार्यालयात प्राप्त झाली. पेठ रोड परिसरातील पत्त्यावर ही डिलिव्हरी देण्याची जबाबदारी कंपनीचा कर्मचारी संशयित प्रसाद राऊत याच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र, पार्सलमध्ये मौल्यवान सोन्याची नाणी असल्याचे समजताच राऊतच्या मनात आमिष निर्माण झाले.
advertisement
असा केला अपहार
संशयित प्रसाद राऊत याने त्याच्या दोन अनोळखी मित्रांच्या मदतीने संगनमत केले. त्याने पार्सल फोडून त्यातील सोन्याची नाणी काढून घेतली आणि मोबाइलवर आलेला ओटीपी सिस्टीममध्ये अपडेट करून पार्सल ग्राहकाला मिळाल्याचे भासवले. प्रत्यक्षात ग्राहकाला वस्तू मिळालीच नव्हती. कुरिअर कंपनीच्या व्यवस्थापनाला या प्रकाराचा सुगावा लागताच त्यांनी सखोल चौकशी केली, तेव्हा हा गंभीर प्रकार समोर आला. याप्रकरणी कंपनीच्या व्यवस्थापकांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
advertisement
ग्राहकांनो सावधान पोलिसांनी दिला सतर्कतेचा इशारा
ऑनलाइन खरेदीत पार्सल घेण्यापूर्वीच ओटीपी सांगणे धोक्याचे ठरू शकते, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच डिलिव्हरी बॉय पत्ता सापडत नसल्याचे सांगून फोनवर ओटीपी मागतो, अशा वेळी तो प्रत्यक्ष घरापाशी पोहोचल्याशिवाय ओटीपी देऊ नका. आपण घरी नसल्यास, घरातील सदस्यांशी संपर्क साधून डिलिव्हरी बॉय तिथे हजर असल्याची खात्री करूनच प्रक्रिया पूर्ण करा. पार्सलची स्थिती संशयास्पद वाटल्यास किंवा डिलिव्हरी बॉयने घाई केल्यास त्वरित कंपनीकडे तक्रार करा, असे आवाहन घटनेनंतर सर्वत्र पोलीस डिपार्टमेंट नागरिकांना करत आहे. तसेच या घटनेबाबत पुढील तपास सायबर पोलीस करत असून, फरार संशयितांचा शोध सुरू आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 10:05 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
ऑनलाईन शॉपिंग पडली महागात, डिलिव्हरी बॉयनेच लंपास केले 10 लाखांचे गोल्ड कॉईन, नाशिकमधील धक्कादायक प्रकार








