महिलांना नको तिथं स्पर्श करणाऱ्या नराधमाला पोलिसांकडून बेड्या, दिवसाढवळ्या करत होता वाईट कृत्य
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
छत्रपती संभाजीनगर शहरातील नंदनवन कॉलनी परिसरात महिलांना नको तिथे स्पर्श करून पळ काढणाऱ्या एका विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीला छावणी पोलिसांनी अवघ्या एका तासात गाठून अटक केली.
छत्रपती संभाजीनगर: शहरातील नंदनवन कॉलनी परिसरात महिलांना नको तिथे स्पर्श करून पळ काढणाऱ्या एका विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीला छावणी पोलिसांनी अवघ्या एका तासात गाठून अटक केली. पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादाने आणि सीसीटीव्हीच्या आधारे केलेल्या अचूक तपासामुळे आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार बुधवारी दुपारचा सुमारास घडला. परिसरातून पायी जाणाऱ्या महिलांच्या मागे आरोपी जाऊन त्यांना वाईट उद्देशाने नको त्या ठिकाणी स्पर्श करत असे आणि नंतर पळून जात असे. काही महिलांनी या लज्जास्पद प्रकाराची माहिती स्थानिकांना दिल्यानंतर छावणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. विवेक जाधव यांनी तत्काळ पथक तयार करून तांत्रिक तपास सुरू केला. स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आला. फुटेजमध्ये आरोपी महिलांना त्रास देत पळून जात असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. पोलिस पथकाने काही तासांतच आरोपीचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतले. त्याची ओळख रफिक खान (रा. उत्तर प्रदेश) अशी झाली असून, तो सध्या संभाजीनगरमध्ये वास्तव्यास होता.
advertisement
पोलिसांनी त्याच्याकडून प्राथमिक चौकशी केली असता, त्याने आपली चूक कबूल केली असल्याचे समजते. या घटनेने परिसरातील महिलांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती. पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलांना दिलासा मिळाला असून, “अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांना समाजात स्थान नाही” अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, छावणी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी डॉ. विवेक जाधव यांनी सांगितले की, “महिलांच्या सुरक्षिततेशी खेळणाऱ्या कोणालाही पोलिस यंत्रणा सोडणार नाही. अशा घटनांवर तात्काळ आणि कडक कारवाई करण्यात येईल.”
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
October 29, 2025 8:36 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
महिलांना नको तिथं स्पर्श करणाऱ्या नराधमाला पोलिसांकडून बेड्या, दिवसाढवळ्या करत होता वाईट कृत्य


