अरे देवा! ATM मध्ये कार्ड टाकलं अन् झटक्यात अकाऊंट रिकामं झालं; छत्रपती संभाजीनगरात नवा स्कॅम समोर
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
देशभरात एटीएम फसवणुकीचे प्रकार नवीन नसले तरी, छत्रपती संभाजीनगरमध्ये वापरण्यात आलेली पद्धत मात्र धक्कादायक आहे.
छत्रपती संभाजीनगर: देशभरात एटीएम फसवणुकीचे प्रकार नवीन नसले तरी, छत्रपती संभाजीनगरमध्ये वापरण्यात आलेली पद्धत मात्र धक्कादायक आहे. एका नामांकित विमान कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला लक्ष्य करून, चोरट्यांच्या एका टोळीने ATM मशीनमध्ये कृत्रिम रित्या बिघाड घडवून त्यांचे कार्ड अडकवले. त्यानंतर मदतीचा बहाणा करत त्यांना एटीएम सेंटरपासून दूर पाठवले आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांच्या खात्यातून 43,000 रुपये काढून घेतले. या ‘स्मार्ट’ फसवणुकीने शहरात खळबळ माजली असून एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात या अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी 10:30 च्या सुमारास वरूड फाट्याचे रहिवासी संजय जाधव हे चिखलठाण्यातील स्टेट बँकेच्या (SBI) एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. जाधव एटीएममध्ये प्रवेश करण्यापूर्वीच आत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने मशीनमध्ये 'स्किमिंग पट्टी' सदृश्य वस्तू वापरून बिघाड घडवला होता. जेणेकरून मशीनमध्ये टाकलेले कार्ड अडकावे. जाधव यांनी एक हजार रुपये काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे कार्ड मशीनमध्ये अडकले. ते कार्ड काढण्यासाठी धडपडत असताना जवळ उभ्या असलेल्या चोरट्याने त्यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या व्यवहारादरम्यान पिन नंबर पहिला.
advertisement
कार्ड निघत नाही हे पाहताच, त्या अनोळखी व्यक्तीने जाधव यांना चक्क मुकुंदवाडी सिग्नलवरील एटीएमकडे पाठवले आणि तिथे सुरक्षारक्षकाला भेटायला सांगितले, जेणेकरून तो कार्ड काढण्यासाठी इथे येईल.जाधव यांनी त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि ते रस्ता ओलांडून त्या समोरच्या सिग्नलवरील एटीएममध्ये गेले. त्याच क्षणी, त्यांना त्यांच्या मोबाईलवर नंबर नसलेला एक अनोळखी कॉल आला. कॉलवर त्यांना त्यांच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर होत असल्याची माहिती मिळाली. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच, जाधव यांनी त्वरित एटीएम सेंटरकडे धाव घेतली.
advertisement
जाधव परत आले, तेव्हा आतला व्यक्ती आणि त्यांचे एटीएम कार्ड दोन्हीही गायब झालेले होते. त्यांनी त्वरीत आपले खाते तपासले असता, त्यांच्या खात्यातून 43 हजार रुपये काढून घेतल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, चोरट्याने ही रक्कम 2.6 किलोमीटर दूर असलेल्या धूत रुग्णालयाच्या जवळील दुसऱ्या एटीएम सेंटरमधून काढली होती.
- पोलिसांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
- अनोळखी लोकांच्या मदतीपासून दूर राहा- एटीएममध्ये कार्ड अडकल्यास किंवा व्यवहारात बिघाड झाल्यास, तेथे उपस्थित कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांच्या मदतीने प्रक्रिया करू नका आणि एटीएम सेंटर सोडू नका.
- त्वरित कार्ड ब्लॉक करा- त्वरित बँकेच्या अधिकृत हेल्पलाईनवर संपर्क साधून कार्ड तात्काळ ब्लॉक करा.
- खाजगी पिन- आपला एटीएम कार्डचा पासवर्ड नेहमी की- पॅड झाकूनच टाका आणि कोणालाही दिसणार नाही याची काळजी घ्या.
- सावधगिरी बाळगा- एटीएममध्ये आधीच कोणी उभे असल्यास किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास, त्या सेंटरमध्ये व्यवहार करणे टाळा.
advertisement
Location :
Maharashtra
First Published :
December 03, 2025 3:59 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
अरे देवा! ATM मध्ये कार्ड टाकलं अन् झटक्यात अकाऊंट रिकामं झालं; छत्रपती संभाजीनगरात नवा स्कॅम समोर


