क्रिकेटचा वाद अन् 10 वीच्या विद्यार्थ्याचा खेळ खल्लास, मधल्या सुट्टीत 8वीच्या पोरानं पाडला रक्ताचा सडा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime News: अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या मुलाचा खून केला आहे.
अहिल्यानगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इथं आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या मुलाचा खून केला आहे. आरोपी विद्यार्थ्याने शाळेच्या मधल्या सुट्टीत दहावीच्या विद्यार्थ्यावर धारदार चाकूने वार केला. हा हल्ला इतका भयंकर होता की दहावीचा विद्यार्थी शाळेतच रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा प्रकार घडताच शाळेच्या शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. संबंधित विद्यार्थ्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
मोहम्मद मुस्तकीम असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. तो अहिल्यानगर येथील मध्यवस्तीत असलेल्या सीताराम सारडा विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता. घटनेच्या दिवशी बुधवारी त्याचा एका आठवीच्या विद्यार्थ्यासोबत क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने थेट मुस्तकीम याच्यावर चाकुने हल्ला केला. आरोपी विद्यार्थ्याने मुस्तकीनच्या पाठीवर आणि हृदयाच्या जवळ चाकुने दोन वार केले.
advertisement
हे वार वर्मी लागल्याने रक्ताच्या थारोळ्यात मुस्तकीन कोसळला. याची माहिती शिक्षकांना मिळाल्यानंतर शिक्षक अमोल कदम आणि सुनील कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने मुलाला उचलून गेटबाहेर आणलं. त्यांनी रिक्षातून मुलाला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. पण रिक्षा थांबली नाही. यामुळे शिक्षकांनी एका दुचाकीवरून मुलाला सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी विद्यार्थ्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे.
advertisement
या घटनेची अधिक माहिती देताना पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितलं की, बुधवारी आठवी आणि दहावीत शिकणाऱ्या मुलांमध्ये वाद झाला होता. हा वाद वाढल्यानंतर आठवीत शिकणाऱ्या मुलाने दहावीत शिकणाऱ्या मुलावर चाकुने वार केले. पाठीवर आणि हृदयाजवळ दोघ गंभीर घाव लागले. हा सगळा प्रकार शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हल्ला झाल्यानंतर जखमी विद्यार्थ्याला सिव्हील रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी सुरू आहे. क्रिकेट खेळण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता, यातूनच ही हत्या झाली, असंही भारती यांनी सांगितलं.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
June 26, 2025 7:53 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
क्रिकेटचा वाद अन् 10 वीच्या विद्यार्थ्याचा खेळ खल्लास, मधल्या सुट्टीत 8वीच्या पोरानं पाडला रक्ताचा सडा