बळीराजा सावधान! 11 शेतकऱ्यांची तब्बल 72 लाखांची फसवणूक, व्यापारी म्हणून आले अन्..
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Grapes Export Fraud: सांगलीत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झालीये. तिघा व्यापाऱ्यांनी द्राक्षे निर्यातीच्या नावाखाली तब्बल 72 लाखांचा गंडा घातला आहे.
सांगली: सध्याच्या काळात दामदुप्पट नफ्याच्या अमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. आता अशाच प्रकारे शेतकऱ्यांची देखील फसवणूक होतेय. सांगलीतील द्राक्ष उत्पादक जात तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. डफळापूर, जिरग्याल, एकुंडी आणि खिलारवाडी परिसरातील 11 द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 72 लाख 14 हजारांची फसवणूक झालीये. याप्ररणात जत पोलीस ठाण्यात 3 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जत तालुक्यातील डफळापूर, जिरग्याळ परिसरात द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. व्यापारी अजिज युनूस हाशमी याने चांगला दर दिल्याने परिसरातील 11 शेतकर्यांनी आपला द्राक्षमाल त्यास दिला. हा व्यवहार 10 जानेवारी रोजी ठरला होता. अजिज युनूस हाशमी, कैफ अजिज हाशमी, शफिक यांनी द्राक्ष उत्पादक शेतकर्यांच्या द्राक्षमालाची पाहणी केली.
advertisement
एका बॉक्सला 4170 दर
द्राक्षमाल बघण्यासाठी व्यापारी अजिज आला. त्याने ‘तुमची द्राक्षे निर्यातक्षम आहेत, बाहेरच्या देशात पाठवावी लागतील, याचा मोबदलाही चांगला मिळेल’ असे सांगितले. यानुसार प्रतिबॉक्स 4 हजार 107 रुपये दर ठरला. एकूण 16 हजार 428 किलो द्राक्षमाल त्यांनी उचलला. त्या द्राक्षमालाची एकूण किंमत 11 लाख 50 हजार रुपये दोन दिवसांनी तुम्हाला देतो, असे सांगून कुमार कोरे व अन्य शेतकर्यांची द्राक्षे त्यांनी नेली.
advertisement
साडेअकरा लाखांची फसवणूक
कोरे यांनी ठरल्यानुसार दोन दिवसानंतर संबंधित व्यापार्यांशी दूरध्वनीवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. तसेच ‘पैसे देत नाही, तुला काय करायचे ते कर’ असे सांगून कोरे यांचा मोबाईल क्रमांक ब्लॅक लिस्टमध्ये टाकला. यामुळे कोरे यांना आपली 11 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची खात्री झाली.
advertisement
फसवणुकीचा गुन्हा दाखल
याबाबतची फिर्याद कुमार सुखदेव कोरे (रा. जिरग्याळ) यांनी जत पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी अजिज युनूस हाशमी, कैफ अजिज हाशमी, शफिक (पूर्ण नाव माहीत नाही, सर्व राहणार पवननगर बिबवेवाडी, पुणे) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
शेतकऱ्यांची 72 लाखांची फसवणूक
कोरे यांच्यासोबतच परिसरातील इतर शेतकऱ्यांची देखील फसवणूक झाली आहे. राजाराम बाळू कोरे (रा. जिरग्याळ, ता. जत) यांची 5 लाख 22 हजार रुपयांची, अंबाजी दशरथ कोडलकर (रा. खिलारवाडी) यांची 3 लाख 85 हजार रुपयांची, खंडू श्रीमंत कोडलकर (रा. खिलारवाडी) यांची 8 लाख 5 हजार रुपयांची, बसवराज बालचंद्र म्हेत्रे (रा. एकुंडी) यांची 1 लाख 59 हजार रुपयांची, संजय बाबू गुड्डोडगी (रा. एकुंडी) यांची 1 लाख 79 हजार रुपयांची फसवणूक झाली.
advertisement
तसेच लक्ष्मण बाबू गुड्डोडगी (रा. एकुंडी) यांची 2 लाख 4 हजार रुपयांची, सचिन शिवाजी चव्हाण (रा. डफळापूर) यांची 12 लाख, यशवंत अजितराव गायकवाड (रा. डफळापूर) यांची 8 लाख 50 हजार रुपयांची, सागर अनिल कुंदळे (रा. डफळापूर) यांची 12 लाख 50 हजार रुपयांची, महादेव पांडुरंग चव्हाण (रा. डफळापूर) यांची 5 लाख रुपयांची, अशी एकूण 11 द्राक्ष बागायतदार शेतकर्यांची 72 लाख 14 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
March 25, 2025 10:51 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
बळीराजा सावधान! 11 शेतकऱ्यांची तब्बल 72 लाखांची फसवणूक, व्यापारी म्हणून आले अन्..