पाठलाग करत कार अडवली, शिर्डीत बंदूक अन् तलवारीचा धाक दाखवत साईभक्तांना लुटलं
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Loot in Shirdi : शिर्डीत काही दिवसांपूर्वी दुहेरी हत्याकांड घडलं होतं. साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असताना आता साईभक्ताला लुटल्याची घटना घडली आहे.
हरीष दिमोटे, प्रतिनिधी अहिल्यानगर : काही दिवसांपूर्वी साई नगरी शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली होती. साई संस्थानमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांना अज्ञाताने टार्गेट केलं होतं. पहाटेच्या वेळी कामावर जात असताना दुचाकी रोखून दोन वेगवेगळ्या ठिकाणी हा हल्ला केला होता. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला होता. शिर्डीतील दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असताना आता साईभक्ताला लुटल्याची घटना उडकीस आली आहे.
सात ते आठ जणांनी कारमधून येत एका साईभक्ताला लुटलं आहे. आरोपींनी बंदूक आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवून ही लुटमार केली आहे. ही धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात घडली आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेतला जात आहे.
मोहित पाटील असं तक्रारदार व्यक्तीचं नाव आहे. ते मुळचे गुजरातच्या सुरत येथील रहिवाशी आहेत. घटनेच्या दिवशी ते आपल्या काही सहकाऱ्यांसोबत इर्टिगा गाडीतून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी चालले होते. त्यांची गाडी लासलगाव मार्गे कोपरगाव तालुक्यातील वेळापूर शिवारात आली असता एका दुसऱ्या चार चाकी कारने त्यांचा पाठलाग केला. आरोपींनी रस्त्यात कार आडवी लावून मोहित पाटील यांची कार रोखली.
advertisement
यानंतर सात ते आठ जण हातात बंदूक आणि धारदार शस्त्रं घेऊन कारमधून उतरले. त्यांनी जीवे मारण्याचा धाक दाखवत ही लुटमार केली. यावेळी चोरट्यांनी मोहित पाटील यांच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 1 लाख 800 रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून घेतला. भररस्त्यावर हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर मोहित पाटील यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून आठ अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Location :
Shirdi,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
February 17, 2025 11:48 AM IST