'तो माझ्यासाठी...', 'डॉन' सिनेमाच्या दिग्दर्शकाचं निधन, अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर, म्हणाले...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Chandra Barot Passes Away : अमिताभ बच्चन यांच्या सुपरहिट चित्रपट 'डॉन'चे दिग्दर्शक चंद्र बरोट यांचे निधन झाले. अमिताभ यांनी या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत, ही आपल्यासाठी 'वैयक्तिक हानी' असल्याचं म्हटलं आहे.
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यात एकापाठोपाठ एक दु:खद बातम्या येत आहेत. त्यांच्या सुपरहिट आणि 'कल्ट क्लासिक' चित्रपट 'डॉन'चे दिग्दर्शक चंद्र बरोट यांचे मुंबईत रविवारी २० जुलै २०२५ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. या बातमीने अमिताभ बच्चन यांना खूप मोठा धक्का बसला आहे, कारण चंद्र बरोट हे त्यांच्यासाठी केवळ एक दिग्दर्शक नव्हते, तर एक कुटुंबातील सदस्य होते. अमिताभ यांनी या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करत, ही आपल्यासाठी 'वैयक्तिक हानी' असल्याचं म्हटलं आहे.
सात वर्षांची झुंज अखेर संपली!
चंद्र बरोट यांचे मुंबईतील वांद्रे येथील एका रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पत्नी दीपा बरोट यांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या माहितीनुसार, चंद्र बरोट गेल्या सात वर्षांपासून 'पल्मोनरी फायब्रोसिस' या दुर्धर फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज देत होते. त्यांच्यावर गुरु नानक रुग्णालयात डॉ. मनीष शेट्टी यांच्या देखरेखेखाली उपचार सुरू होते. यापूर्वी त्यांना जसलोक रुग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं. दीर्घकाळ चाललेल्या या आजारपणामुळे अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
advertisement
चंद्र बरोट यांच्या निधनानंतर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर एक भावनिक आदरांजली वाहिली आहे. "आणखी एक दुःखद क्षण... आणखी एक", अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिलं आहे, "माझे प्रिय मित्र आणि 'डॉन'चे दिग्दर्शक चंद्र बरोट यांचे आज सकाळी निधन झाले... हे नुकसान शब्दात मांडणे कठीण आहे.. हो, आम्ही एकत्र काम केले, पण तो माझ्यासाठी एका कुटुंबातील सदस्यापेक्षाही अधिक होता.. मी फक्त प्रार्थना करू शकतो."
advertisement
चंद्र बरोट हे प्रसिद्ध अभिनेता-चित्रपट निर्माता मनोज कुमार यांचे दीर्घकाळ सहायक दिग्दर्शक होते. 'रोटी कपडा और मकान' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांची अमिताभ आणि झीनत अमान यांच्याशी मैत्री झाली होती. या मैत्रीतूनच नंतर त्यांनी 'डॉन' चित्रपटासाठी एकत्र काम केलं. अमिताभ आजही त्या काळातल्या आठवणी जपून आहेत.
'डॉन' : एक अजरामर चित्रपट!
advertisement
अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिकेत साकारलेला 'डॉन' हा चित्रपट १२ मे १९७८ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स आणि जबरदस्त अॅक्शन सीक्वेन्समुळे हा चित्रपट प्रचंड हिट ठरला आणि 'कल्ट क्लासिक' म्हणून ओळखला जाऊ लागला.
आधुनिक काळात 'डॉन'चा वारसा फरहान अख्तरच्या 'डॉन' फ्रँचायझीमधून पुढे नेण्यात आला आहे, ज्यामुळे या क्लासिकला एक नवीन आणि समकालीन रूप मिळालं आहे. शाहरुख खानने या फ्रँचायझीचे दोन भाग केले, तर आता रणवीर सिंग तिसऱ्या भागासाठी तयारी करत आहे. पण, या सगळ्याची सुरुवात करणारे चंद्र बरोट मात्र आज आपल्यात नाहीत. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली असून एका युगाचा अंत झाल्याचं म्हटलं जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 20, 2025 5:25 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तो माझ्यासाठी...', 'डॉन' सिनेमाच्या दिग्दर्शकाचं निधन, अमिताभ बच्चन यांना अश्रू अनावर, म्हणाले...