Explainer: लंडनच्या स्टेशनवरील साइनबोर्डाचा वाद झाला आंतरराष्ट्रीय; मस्कपासून ममता बॅनर्जींची उडी, प्रकरण नेमके काय?

Last Updated:

Explainer: एखाद्या शहरातील स्टेशनच्या साइनबोर्डवरील नाव कोणत्या भाषेत असावा हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला येण्याचे काहीच कारण नाही. लंडन शहरापुरता मर्यादीत हा विषय मोठा का झाला? नेमके काय घडले? याची सुरुवात कोठून आणि कधी झाली? जाणून घेऊया...

News18
News18
लंडनमधील व्हाईटचॅपल अंडरग्राउंड स्टेशनवरील साइनबोर्ड इंग्रजीसोबतच बंगाली भाषेत लावण्यात आल्यावरून सध्या मोठा वाद सुरू झाला आहे. गंमत म्हणजे लंडन शहरापुरता मर्यादीत असलेल्या या विषयावर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. लंडनमधील या विषयावर अमेरिकेतील उद्योगपती एलन मस्क यांनी उडी मारली आहे. तर भारतातील पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील यावर एक ट्विट केले होते. एका शहातील साइनबोर्डचा विषय इतका मोठा होण्याचे कारण काय? नेमके काय घडले? याची सुरुवात कोठून आणि कधी झाली? जाणून घेऊया न्यूज १८ मराठीच्या Explainer मधून...
काय घडले?
लंडनच्या व्हाईटचॅपल अंडरग्राउंड स्टेशनवरील साइनबोर्ड इंग्रजीसोबतच बंगाली भाषेत लावण्यात आला. हा निर्णय त्या भागातील मोठ्या ब्रिटिश बांगलादेशी समुदायाच्या योगदानाला मान्यता देण्यासाठी घेण्यात आला होता. मात्र रिफॉर्म यूके पार्टीचे खासदार रूपर्ट लोव यांनी यावर आक्षेप घेतला आणि ट्वीट करत म्हटले की, हे लंडन आहे आणि स्टेशनचे नाव केवळ इंग्रजीमध्ये असायला हवे. यावर टेस्ला आणि एक्स (Twitter)चे प्रमुख एलन मस्क यांनी त्यांच्या या मताला पाठिंबा देत Yes असे एक शब्दाचे उत्तर दिले. मस्कच्या या प्रतिसादामुळे हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर अचानक चर्चेत आला आणि सोशल मीडियावर वाद सुरू झाला.
advertisement
वाद आणि प्रतिक्रियांचा पाऊस
एलन मस्क यांनी रूपर्ट लोव यांच्या मताला पाठिंबा दिला. ब्रिटीश राजकारणातील मुद्द्यांवर प्रतिक्रिया देण्याची मस्क यांची ही पहिली वेळ नाही. आता देखील त्यांनी या विषयात मत व्यक्त करून उडी मारली आहे. मस्क यांची ही प्रतिक्रिया पुन्हा चर्चेचा विषय ठरली. मस्क यांच्या आधी भारतातील पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावर आनंद व्यक्त करत ट्विटरवर एक पोस्ट केली होती. त्यांच्या ट्विटमुळे हा मुद्दा भारत आणि बांगलादेशातही चर्चेत आला.
advertisement
दरम्यान टॉवर हॅम्लेट्स नगरसेवक आणि ब्रिटिश बांगलादेशी पॉवर & इन्स्पिरेशन संस्थेचे संस्थापक अब्दाल यांनी स्पष्ट केले की, बांगलादेशच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये हे घडले कारण व्हाईटचॅपलमध्ये मोठा ब्रिटिश बांगलादेशी समुदाय आहे.बंगाली भाषेतील फलक हा केवळ भाषिक गरजांसाठी नव्हे, तर ब्रिटनमधील बांगलादेशी समुदायाच्या योगदानाला मान्यता देण्यासाठी आहे.
'स्वाधिनता ट्रस्ट' या टॉवर हॅम्लेट्समधील बांगलादेशी समुदायाच्या संस्थेचे संचालक अन्सार उल्लाह म्हणाले की, बंगाली फलक लावण्याचा उद्देश हा त्या समुदायाला मान्यता देणे हा आहे, इंग्रजी न वाचू शकणाऱ्या लोकांसाठी नव्हे. तर हिंदी शिक्षिका असलेल्या इंदू बारोट यांनी मात्र हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले. अशा साइनबोर्डमुळे एक विशिष्ट समाजाला त्या भागावर मालकी असल्याची भावना निर्माण होऊ शकते. आपण ब्रिटनमध्ये राहतो, त्यामुळे सर्व फलक इंग्रजीत असायला हवेत, असे बारोट म्हणाल्या.
advertisement
लिटल बांगलादेश
ही घटना लंडनमधील व्हाईटचॅपल अंडरग्राउंड स्टेशनवर घडली. हे ठिकाण मोठ्या प्रमाणावर ब्रिटिश बांगलादेशी नागरिकांनी वसवले आहे आणि या भागाला 'लिटल बांगलादेश' असेही काही वेळा संबोधले जाते.विशेष म्हणजे याआधीही लंडनमधील चायनाटाउनमध्ये चिनी भाषेत, ब्रिक लेनमध्ये बंगाली भाषेत, आणि साउथऑलमध्ये पंजाबी (गुरुमुखी) लिपीत फलक दिसतात, त्यामुळे व्हाईटचॅपलसाठी हा निर्णय नवा नव्हता.
advertisement
2021 घटना...
बंगाली भाषेतील साइनबोर्ड 2021 मध्ये बांगलादेशच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लावण्यात आला होता. त्यावेळी अब्दाल उल्लाह यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम राबवले गेले होते. ज्यात लंडन आयला लाल-हिरव्या रंगाने प्रकाशित करणे, बांगलादेशी समुदायाच्या योगदानावर आधारित एक म्युरल तयार करणे आणि व्हाईटचॅपल अंडरग्राउंड स्टेशनवर साइनबोर्ड लावण्याचा प्रस्ताव ठेवणे. 2021 मध्ये अब्दाल उल्लाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा प्रस्ताव Transport for London कडे पाठवला.TfLला हा प्रस्ताव योग्य वाटला आणि त्यांनी मंजुरी दिली. काही दिवसांतच बंगाली भाषेतील नवीन साइनबोर्ड व्हाईटचॅपल स्टेशनवर लावण्यात आला.
advertisement
2025 मध्ये रूपर्ट लोव यांनी याला विरोध दर्शवला आणि एलन मस्कने त्याचा पाठिंबा दिला. या प्रतिक्रियांमुळे सोशल मीडियावर हा वाद आणखी पेटला आणि ब्रिटनमधील स्थलांतर आणि स्थानिक संस्कृतीच्या स्वीकाराविषयी नव्याने चर्चा सुरू झाली. ही घटना केवळ एका भाषेतील साइनबोर्डबाबत नसून ब्रिटनमधील स्थलांतरित समुदायांच्या मान्यतेसंबंधीच्या भाग आहे.
बंगाली फलक का लावला?
-ब्रिटनमध्ये राहणाऱ्या बांगलादेशी समुदायाने आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर मोठे योगदान दिले आहे.
advertisement
-ब्रिक लेनच्या रेस्टॉरंट्सपासून ते वस्त्रोद्योगापर्यंत बांगलादेशी नागरिकांची लक्षणीय भूमिका आहे.
-आधीपासूनच चायनाटाउन आणि साउथऑलमध्ये अशा प्रकारचे साइनबोर्ड असल्याने व्हाईटचॅपलसाठी हा निर्णय योग्य वाटला.
रूपर्ट लोव यांचा विरोध कशासाठी?
रूपर्ट लोव आणि त्यांचा पक्ष "Reform UK" स्थलांतरितांविरोधी धोरणे मांडत असतो. त्यांच्या मते,ब्रिटनमध्ये सार्वजनिक ठिकाणी इंग्रजीशिवाय इतर भाषांना स्थान देणे चुकीचे आहे. एलन मस्क ब्रिटनमधील अनेक मुद्द्यांवर सोशल मीडियावर मतप्रदर्शन करतात आणि त्यांच्या Yes या एका शब्दाने हा वाद लंडनच्या बाहेर आला.
संस्कृती जपण्याचा प्रयत्न की समाजात विभागणी
काही जणांना हा निर्णय संस्कृती जपण्याचा प्रयत्न वाटतो, तर काही जणांना तो स्थानिक समाजात विभागणी करणारा वाटतो.एलन मस्कसारख्या प्रभावशाली व्यक्तीने या विषयावर प्रतिक्रिया दिल्यामुळे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय चर्चेत आला आहे. ब्रिक लेन, साउथऑल, चायनाटाउन यांसारख्या भागांत आधीच स्थानिक भाषेतील फलक आहेत, त्यामुळे हा विरोध राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे काही लोकांचे मत आहे.
भारतात देखील बोर्ड कोणत्या भाषेत असावेत यावरून अनेकदा वाद झाल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेत बोर्ड असावेत अशी भूमिका मनसेने नेहमी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी आंदोलने देखील केली आहेत. लंडनमधील स्टेशनच्या साइनबोर्डवर इंग्रजीबरोबर स्थानिक समाजाच्या भाषेचा समावेश असावा का? की हे इंग्रजीच असावे? या विषयावर तुमचे काय मत आहे? हे आम्हाला नक्की सांगा.
view comments
मराठी बातम्या/Explainer/
Explainer: लंडनच्या स्टेशनवरील साइनबोर्डाचा वाद झाला आंतरराष्ट्रीय; मस्कपासून ममता बॅनर्जींची उडी, प्रकरण नेमके काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement