डोंबिवलीच्या शॉरमा विकणाऱ्या तरुणीचा संवाद अन् पोलिसांचा लाठीचार्ज, सावंताच्या लेकीसोबत नेमकं काय घडलं?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
डोंबिवली स्टेशनबाहेर शॉरमा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका मराठी तरुणीने केडीएमसी प्रशासनावर गंभीर आरोप केल्यानंतर हा वाद चिघळला आहे.
ठाणे : डोंबिवली स्टेशन परिसरातील फेरीवाला, अतिक्रमण आणि मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून, या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा निर्माण केली आहे. डोंबिवली स्टेशनबाहेर शॉरमा विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका मराठी तरुणीने केडीएमसी प्रशासनावर गंभीर आरोप केल्यानंतर हा वाद चिघळला आहे.
संबंधित तरुणी डोंबिवली स्टेशन परिसरात गेल्या काही काळापासून हातगाडीवर शॉरमा विक्रीचा व्यवसाय करत आहे. मात्र, केडीएमसी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून वारंवार केवळ तिच्याच स्टॉलवर कारवाई केली जात असल्याचा दावा तिने केला आहे. इतर अनेक हातगाड्या आणि फेरीवाले व्यवसाय करत असताना, आपल्यालाच लक्ष्य केले जात असल्याचा आरोप तिने सोशल मीडियावरून केला. विशेष म्हणजे, काही फेरीवाल्यांना पालिका अधिकारी अप्रत्यक्षपणे पाठीशी घालत असल्याचाही दावा तिने आपल्या पोस्टमध्ये केला.
advertisement
मनसेने घेतली दखल
या संदर्भात तरुणीने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपली कैफियत मांडली. या पोस्टची दखल थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव डोंबिवलीत दाखल झाले. या घटनेनंतर स्टेशन परिसरात मनसे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि तरुणीच्या समर्थनार्थ मोठी गर्दी जमू लागली.
advertisement
नेमकं काय घडलं?
दरम्यान, तरुणी पत्रकारांशी संवाद साधत असताना परिस्थिती तणावपूर्ण झाली. जमाव वाढू लागल्यानंतर पोलिसांनी संबंधित परिसरात लाठीचार्ज केला. तरुणीच्या जवळ उभे असलेले नागरिक आणि समर्थक यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. या कारवाईमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेदरम्यान पोलिस आणि पत्रकारांमध्येही शाब्दिक वाद झाला. तरुणी हे सर्व प्रसिद्धीसाठी करत असल्याचे वक्तव्य पोलिसांकडून करण्यात आल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
advertisement
कोण आहे तरुणी?
डोंबिवलीत एकता सावंत ही एक मराठी तरुणी शॉरमा विकण्याचा व्यवसाय करते. तिच्या इंस्टाग्रामवर 61 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि तिची व्हिडिओज लाखो वेळा पाहिली जातात. मात्र तिच्या स्टॉलवर महापालिकेकडून सतत कारवाई होत होती तर इतर फेरीवाल्यांना केडीएमसीचे अधिकारी पाठीशी असल्याचा तिला आरोप आहे. एकता सावंत म्हणते की,''माझ्याकडून रोज 300 रुपये हप्ता घेतला तरी कारवाई केली जाते'' आणि याबाबत तिने खंत व्यक्त केली.
advertisement
डोंबिवलीत वातावरण तापण्याची शक्यता
एकता सावंतने दाखवलेल्या धाडसामुळे आणि सोशल मीडियावर असलेल्या तिच्या लोकप्रियतेमुळे तिला मोठा पाठिंबा मिळत आहे. मनसेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे या पाठिंब्याला अधिक बळ मिळाले आहे.
एकीकडे फेरीवाला धोरण, दुसरीकडे मराठी तरुणीवर होत असल्याचा कथित अन्याय आणि त्याला मिळणारा राजकीय पाठिंबा, यामुळे डोंबिवली स्टेशन परिसरातील हा मुद्दा येत्या काळात आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jan 24, 2026 5:25 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
डोंबिवलीच्या शॉरमा विकणाऱ्या तरुणीचा संवाद अन् पोलिसांचा लाठीचार्ज, सावंताच्या लेकीसोबत नेमकं काय घडलं?








