Dombivli News: डिसेंबरअखेर जलसंकट, डोंबिवलीत संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार, कधी?
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Dombivli News: डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वर्षाअखेर पाणी जपून वापरावं लागणार असून संपूर्ण शहराचा पुरवठा खंडित राहणार आहे.
डोंबिवली: डोंबिवलीतील नागरिकांना डिसेंबरअखेर पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. येत्या मंगळवारी, 30 डिसेंबर रोजी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा 12 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने हा निर्णय घेतला असून सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.
पालिका हद्दीतील खंबाळपाडा येथील जलकुंभाच्या अंतर्गत जलवाहिनीमध्ये गळती आढळून आली आहे. ही गळती रोखण्यासाठी तसेच भविष्यातील पाणीगळती टाळण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी जलवाहिनीतून पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवणे आवश्यक असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका उल्हास नदीतून पाणी उचलते. मोहिली उदंचन केंद्रातून उल्हास नदीतील पाणी उचलून ते नेतिवली जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाते. येथे दररोज सुमारे 150 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. शुद्धीकरणानंतर हे पाणी डोंबिवली पूर्व व पश्चिम भागासह कल्याण शहरालाही वितरित करण्यात येते.
या योजनेअंतर्गत खंबाळपाडा जलकुंभाची अंतर्गत जलवाहिनी पालिकेच्या मुख्य जलवाहिनीस जोडलेली आहे. याच ठिकाणी गळती झाल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत होता. त्यामुळे ही गळती तातडीने दुरुस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
advertisement
पालिकेने नागरिकांना पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करून रात्री 9 नंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाईल असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पालिकेने केले आहे.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 9:21 AM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli News: डिसेंबरअखेर जलसंकट, डोंबिवलीत संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार, कधी?








