कल्याण हादरले! चारित्र्याच्या संशयातून 9 वर्षांच्या मुलासमोरच पत्नीचा गळा चिरला; चाळीत खळबळ
- Published by:Prachi Amale
Last Updated:
आपण जुने वाद विसरून पुन्हा एकदा एकत्र संसार करूया, अशी गळ पतीने पत्नीला घातली. मात्र पत्नीने या प्रस्तावास स्पष्ट नकार दिला.
ठाणे : संशयाचे भूत किती भीषण असू शकते, याचा प्रत्यय कल्याणमधील उंबर्डे परिसरात आला आहे. आपल्या नऊ वर्षांच्या चिमुरड्यासमोरच एका नराधम पतीने चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. या थरारानंतर आरोपी पतीने थेट नाशिक गाठून पोलिसांसमोर शरणागती पत्करली, तेव्हा या विदारक घटनेचा उलगडा झाला. अर्चना उर्फ बाली विशाल भुतकर (वय 25) असे मृत महिलेचे नाव असून, पती विशाल साहेबराव भुतकर (वय 30 ) याला पोलिसांनी अटक केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, विशाल आणि अर्चना यांच्यात गेल्या काही काळापासून सतत वाद होत होते. याच वादातून आणि संशयातून गेल्या दीड वर्षांपासून हे दाम्पत्य वेगळे राहत होते. विशाल हा आपल्या मोठ्या मुलासह नाशिकमध्ये वास्तव्यास होता, तर अर्चना कल्याणमधील उंबर्डे येथील केडीएमसी गार्डनजवळील एका चाळीत राहत होती. ती तिथे घरकाम करून आपल्या पाच वर्षांच्या मुलीचा सांभाळ करत होती.
advertisement
मुलासमोरच गळा चिरला
बुधवार, 11 मार्च रोजी विशाल आपल्या नऊ वर्षांच्या मुलाला घेऊन नाशिकहून कल्याणला अर्चनाला भेटण्यासाठी आला होता. आपण जुने वाद विसरून पुन्हा एकदा एकत्र संसार करूया, अशी गळ त्याने अर्चनाला घातली. मात्र, अर्चनाने या प्रस्तावास स्पष्ट नकार दिला. या नकाराने विशालचा राग अनावर झाला आणि त्यांच्यात जोरदार भांडण सुरू झाले. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि संतापलेल्या विशालने आपल्यासोबत आणलेल्या चाकूने अर्चनावर मुलासमोरच हल्ला केला.
advertisement
9 वर्षाच्या मुलासमोर थरार
हा सर्व थरार 9 वर्षांच्या मुलाच्या डोळ्यासमोर घडला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अर्चनाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी विशाल तिथून पसार झाला आणि त्याने थेट नाशिक गाठले. तिथे पोलिसांसमोर हजर होऊन त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. नाशिक पोलिसांनी तात्काळ कल्याणच्या खडकपाडा पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अर्चनाचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 4:54 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
कल्याण हादरले! चारित्र्याच्या संशयातून 9 वर्षांच्या मुलासमोरच पत्नीचा गळा चिरला; चाळीत खळबळ









