Diwali Shopping : दिवाळीनिमित्त दादरमध्ये भरलंय खास प्रदर्शन, 10 रुपयांपासून वस्तू खरेदीची संधी नका सोडू
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या प्रदर्शनात मुलांनी स्वतः बनवलेल्या पणत्या, मोत्यांची तोरणं, ग्रीटिंग कार्ड्स, रांगोळ्या, रंगवलेल्या कापडी बॅग्स आणि मोत्यांपासून बनवलेल्या अँटिक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबई: दादर पश्चिम येथील आव्हान पालक संघा तर्फे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विशेष मुलांसाठी एक विशेष तीन दिवसीय हस्तकला प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन 9, 10 आणि 11 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 1 ते 5 या वेळेत कोटवाडी पद्माबाई ठाकर मार्ग, ग्राउंड फ्लोअर, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम) या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाचा उद्देश विशेष मुलांना त्यांच्या कौशल्यांची आणि सर्जनशीलतेची कला जगासमोर सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे.
या प्रदर्शनात मुलांनी स्वतः बनवलेल्या पणत्या, मोत्यांची तोरणं, ग्रीटिंग कार्ड्स, रांगोळ्या, रंगवलेल्या कापडी बॅग्स आणि मोत्यांपासून बनवलेल्या अँटिक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या वस्तू आकर्षक आणि वापरासाठी उपयुक्त असून त्यांच्या किमती केवळ 10 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत आहेत. विशेष म्हणजे या सर्व वस्तू मुलांनी स्वतःच्या हस्तकौशल्याने तयार केल्या असून त्यामध्ये कल्पकता आणि मेहनत यांचा सुंदर मिलाफ दिसतो.
advertisement
या उपक्रमाविषयी माहिती देताना आव्हान पालक संघाच्या वंदना कर्वे सांगतात, मुलांनी ही सर्व कामं खूप मनापासून आणि आनंदाने केली आहेत. वस्तू विकल्या गेल्यावर त्यांना मानधन आणि दिवाळी बोनसही दिला जातो, त्यामुळे त्यांना खूप समाधान मिळतं आणि काम करण्याची प्रेरणाही वाढते.
advertisement
या प्रदर्शनाच्या माध्यमातून केवळ आर्थिक मदतच नव्हे तर मुलांच्या आत्मविश्वासातही लक्षणीय वाढ होते. ग्राहकांनी येथे येऊन या वस्तू विकत घेतल्यास त्यांचा आनंद द्विगुणित होतो आणि त्यांच्या मेहनतीला योग्य तो सन्मान मिळतो.
दिवाळीच्या खरेदीला सामाजिक भानाची जोड द्यायची असेल तर हे प्रदर्शन नक्कीच भेट देण्यासारखं आहे. प्रत्येक खरेदीमागे या मुलांची मेहनत, स्वाभिमान आणि आनंद दडलेला आहे तो अनुभवण्यासाठी येथे येणं ही एक सामाजिक बांधिलकी ठरू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 09, 2025 4:29 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali Shopping : दिवाळीनिमित्त दादरमध्ये भरलंय खास प्रदर्शन, 10 रुपयांपासून वस्तू खरेदीची संधी नका सोडू







