Skin Care : प्रकृतीच्या दोषानुसार घ्या त्वचेची काळजी, आयुर्वेदात सांगितलेल्या उपायांनी रुप दिसेल सुंदर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
प्रत्येकाची त्वचाही वेगळी असल्यानं इतरांसाठी उपयुक्त ठरतं ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरेलच असं नाही. आयुर्वेदानुसार, आपली त्वचा आपल्या वात, पित्त आणि कफ या दोषांवर अवलंबून असते. हे तिन्ही दोष संतुलित असतात, तेव्हाच आपल्या चेहऱ्यावर खरी चमक येते. डॉ. हंसाजी यांनी प्रकृतीनुसार नैसर्गिक चमक कशी मिळवता येईल यासाठी काही टिप्स दिल्यात.
मुंबई : प्रत्येकाची प्रकृती जशी वेगळी तशी प्रत्येकाची त्वचाही वेगळी असते. त्यामुळे एका व्यक्तीला उपाय लागू पडला तर तो दुसऱ्याला लागू होईलच असं होत नाही.
प्रत्येकाची त्वचाही वेगळी असल्यानं इतरांसाठी उपयुक्त ठरतं ते तुमच्यासाठी उपयुक्त ठरेलच असं नाही. आयुर्वेदानुसार, आपली त्वचा आपल्या वात, पित्त आणि कफ या दोषांवर अवलंबून असते. हे तिन्ही दोष संतुलित असतात, तेव्हाच आपल्या चेहऱ्यावर खरी चमक येते. डॉ. हंसाजी यांनी प्रकृतीनुसार नैसर्गिक चमक कशी मिळवता येईल यासाठी काही टिप्स दिल्यात.
वात दोष - त्वचा वारंवार कोरडी, ताणलेली वाटत असेल किंवा तिला सहज भेगा पडत असतील, तर तुमचा दोष वात आहे.
advertisement
अशावेळी, त्वचेचा समतोल राहण्यासाठी खोलवर पोषण देणं आणि आर्द्रता आवश्यक आहे. यासाठी डॉ. हंसाजी यांनी एक आयुर्वेदिक फेस मास्क सुचवला आहे. यासाठी एक मोठा चमचा मध, एक छोटा चमचा बदामाचं तेल आणि गुलाबाच्या काही कुस्करलेल्या पाकळ्या लागतील.
advertisement
हे सर्व घटक व्यवस्थित मिसळा आणि सुमारे पंधरा मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. मधामुळे त्वचेतला ओलावा टिकून राहिल, बदामाच्या तेलानं त्वचेचं खोलवर पोषण होईल आणि गुलाबाच्या पाकळ्यांमुळे त्वचेला थंडावा मिळेल. याव्यतिरिक्त, आहारात ॲव्होकॅडोचा समावेश नक्की करा. यातल्या आरोग्यदायी फॅट्समुळे त्वचेला आतून आर्द्रता मिळेल.
पित्त दोष - दुसरा आहे पित्त दोष. त्वचा खूप संवेदनशील आहे का? सूर्यप्रकाशात गेल्यावर तुमचा चेहरा लाल होतो किंवा जळजळ जाणवत असेल तर हे हे पित्त दोषाचं लक्षण आहे. यासाठी, आपल्याला थंडावा देणाऱ्या किंवा त्वचेला आराम देणाऱ्या घटकांची आवश्यकता असते.
advertisement
फेस मास्क तयार करण्यासाठी, दोन मोठे चमचे काकडीचा रस, एक मोठा चमचा कोरफडीचा गर आणि पुदिन्याची काही पानं ठेचून घ्या. हा थंडावा देणारा पॅक वीस मिनिटांसाठी लावा. काकडी आणि कोरफडीमुळे जळजळ शांत होईल, तर पुदिना तुमच्या त्वचेला ताजेपणा देईल. याव्यतिरिक्त, उन्हाळ्यात भरपूर टरबूज आणि खरबूज खा. यातल्या पाण्याचं भरपूर प्रमाण आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेचा लालसरपणा कमी करण्यास मदत होते.
advertisement
कफ दोष - तिसरा प्रकार कफ दोष आहे. त्वचा तेलकट असेल, त्वचेची छिद्रं मोठी असतील किंवा वारंवार मुरुमं येत असतील, तर तुम्हाला कफ दोष आहे. या स्थितीमुळे त्वचेत अतिरिक्त तेल तयार होतं. यासाठी चिमूटभर हळद, एक मोठा चमचा मुलतानी माती आणि एक छोटा चमचा कडुलिंबाची पेस्ट लागेल.
advertisement
पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनी धुवा. मुलतानी माती अतिरिक्त तेल शोषून घेईल, हळदीमुळे मुरुम कमी होतील आणि कडुनिंबामुळे त्वचा स्वच्छ होईल. याव्यतिरिक्त, गोड पदार्थ मर्यादित प्रमाणात खा आणि मोसमी फळं खा. त्यातील अँटीऑक्सिडंट्स तेलकट त्वचेसाठी वरदान ठरतात.
तुम्ही प्रकृती दोषानुसार त्वचेची काळजी घेता आणि तुमच्या दैनंदिन आहारात योग्य फळं आणि भाज्यांचा समावेश करता, तेव्हा आतून संतुलन निर्माण होतं. संतुलनाचे परिणाम त्वचेवर दिसून येतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 2:28 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : प्रकृतीच्या दोषानुसार घ्या त्वचेची काळजी, आयुर्वेदात सांगितलेल्या उपायांनी रुप दिसेल सुंदर






