मुलं सतत शांत असतात? पालकांनो वेळीच सावध व्हा, त्यांचं भविष्य अंधारातून बाहेर काढा!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
डॉक्टरही सांगतात की, मुलांना केवळ अभ्यासात अडकवून ठेवू नका, त्यांना इतर ऍक्टिव्हिटीज करायला लावा. मुलांना पडणारे प्रश्न, त्यांची उत्सुकता, उत्साह हे त्यांच्या निरोगी मनाचं लक्षण असतं.
अभय पांडे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : जास्त धावपळ करू नका, जास्त खिदळू नका, शांत बसा, असं आपण लहान मुलांना वारंवार सांगत असतो. परंतु लहान मुलांनी थोडंफार हसणं-खेळणं आवश्यक असतं. त्यामुळेच त्यांचं आरोग्य सुदृढ राहतं. डॉक्टरही सांगतात की, मुलांना केवळ अभ्यासात अडकवून ठेवू नका, त्यांना इतर ऍक्टिव्हिटीज करायला लावा. मुलांना पडणारे प्रश्न, त्यांची उत्सुकता, उत्साह हे त्यांच्या निरोगी मनाचं लक्षण असतं. मुलं सतत गप्प राहणं हे गंभीर असू शकतं, असं स्वतः डॉक्टर सांगतात.
advertisement
डिप्रेशन हा एक गंभीर आजार आहे. आता कुठे लोकांना तो बऱ्यापैकी माहित झालाय. चिंतेची बाब ही आहे की, लहान मुलांमध्येही डिप्रेशन पाहायला मिळतं. जसजसं वय वाढतं, कामाचा व्याप वाढतो, स्पर्धा वाढते, तसतसं डिप्रेशन येणं साहजिक आहे. परंतु जर खेळण्या-बागडण्याच्या वयात डिप्रेशन यायला लागलं, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिराज कादरी सांगतात, पूर्वी आई-वडील म्हणायचे मुलं दिवसभर कार्टून बघत बसतात, सतत टीव्ही पाहणं मुलांच्या आरोग्यासाठी धोकादायक होतंच. मात्र आता त्यांच्या हातात सतत मोबाईल असतो, जे जास्त धोक्याचं आहे. त्याचा परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर होतो. मोबाईल गेम्समध्ये दिलेले टास्क त्यांचा ताण वाढवणारे असतात.
advertisement
डॉक्टरांनी पुढे सांगितलं, बहुतेक घरांमध्ये आई-वडील दोघंही कामावर जातात. त्यामुळे मुलं एकलकोंडी होतात. एकतर ती खूप शांत होतात किंवा खूप रागीट होतात. ती एकटी कुठेही जायला घाबरतात. आता आजी-आजोबाही खूप कमी घरांमध्ये असतात. त्यामुळे मुलं एवढी एकटी पडतात की आजकाल लहान मुलांमध्ये आत्महत्येची प्रकरणं वाढली आहेत, जे अतिशय गंभीर आहे. त्यामुळे आई-वडिलांनी कितीही व्यस्त वेळापत्रक असलं, कितीही धावपळ असली, तरी मुलांना वेळ द्यायलाच हवा.
advertisement
आई-वडिलांनी मुलांसोबत मैत्री करायला हवी. त्यांच्यावर कोणत्याच बाबतीत जबरदस्ती करू नये. परीक्षेत कमी गुण पडले किंवा स्पर्धेत अपयश आलं, तर कायम त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करावा. त्यांना व्यवस्थितपणे, समजेल अशा भाषेत उज्ज्वल भविष्याची कल्पना द्यायची. जर मुलांचं पालकांसोबत अतिशय जिव्हाळ्याचं आणि घट्ट नातं असेल तर ते कधीच टोकाचं पाऊल उचलणार नाहीत.
advertisement
दरम्यान, आपल्या मुलांनाच नाही, तर आपण इतर कोणालाही जर मानसिकरीत्या खचलेलं पाहिलं तर त्यांना आधार द्यावा. उपचार मिळण्यासाठी मदत करावी, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
Location :
Maharashtra
First Published :
October 27, 2024 5:37 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
मुलं सतत शांत असतात? पालकांनो वेळीच सावध व्हा, त्यांचं भविष्य अंधारातून बाहेर काढा!