Immunity Booster Kadha: पावसाळ्यात हा काढा प्यायल्यानं अनेक संसर्गजन्य आजारांपासून होईल रक्षण
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून स्वतःला विशेष जपावं लागतं. त्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आवश्यक असतं.
प्रियंका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : आता राज्यभरात सर्वत्र हळूहळू पावसाला सुरूवात होतेय. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून स्वतःला विशेष जपावं लागतं. त्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आवश्यक असतं. त्यामुळे पौष्टिक आहार घेणं, वैयक्तिक स्वच्छता पाळणं, सार्वजनिक स्वच्छता पाळणं, इत्यादी काळजी घ्यायलाच हवी. आज आपण शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी एक अत्यंत रामबाण असा काढा पाहणार आहोत. आहारतज्ज्ञ प्रणाली बोबडे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
दरम्यान, पावसाळा हा ऋतू विविध संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव असणारा काळ असतो. या काळात वातावरणातील बदल, आर्द्रता आणि तापमानातील चढ-उतार यामुळे सर्दी, खोकला, ताप, घशाचे विकार यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत काढा पिणं हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य सांभाळण्यासाठी उपयुक्त ठरतं.
advertisement
काढ्यासाठी लागणारं साहित्य :
तुळस - 10 ते 12 पानं
आलं - साधारण 1 इंचाचा तुकडा
काळीमिरी - 4 ते 5 दाणे
लवंग - 2 ते 3
दालचिनी - साधारण 1 इंचाचा तुकडा
गूळ - चवीनुसार
पाणी - 2 कप
काढा बनवण्याची कृती :
सर्वात आधी पाणी उकळत ठेवा. त्यात तुळशीची पानं, आलं, काळीमिरी, लवंग आणि दालचिनी घाला. मिश्रणाला एक छान उकळी येऊद्या. पाणी अर्ध होईपर्यंत उकळा. शेवटी गूळ घालून मिसळा आणि काढा गाळून गरमागरम प्या.
advertisement
काढ्याचे फायदे :
तुळस औषधी गुणांनी परिपूर्ण असते हे काही वेगळं सांगायला नको. तुळशीत असलेल्या अँटीबायोटिक गुणधर्मांमुळे विषाणूंचा नाश होऊन आजाराचा संसर्ग कमी होण्यास मदत मिळते. शिवाय यातल्या अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे संसर्गापासून आरोग्याचं रक्षण होतं. शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसंच आल्यामुळे पचनशक्ती उत्तम होते, पोटाच्या आजारांवर आराम मिळतो. यात अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे सूज आणि वेदनाही बऱ्या होतात. काळीमिरीत असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे शरिरातले विषारी घटक कमी होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. लवंगामुळे शरिरातली सूज कमी होते, यात असलेले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म संसर्गजन्य आजारांचा प्रतिकार करतात. शिवाय दातदुखी आणि तोंडाच्या आजरांवरही लवंग गुणकारी असते. दालचिनीमुळे रक्तातल्या साखरेचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत मिळते. शिवाय दालचिनीत अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, जे शरिराचं विषारी घटकांपासून रक्षण करतात. तसंच दालचिनीमुळेही रोगप्रतिकारक शक्ती उत्तम होते.
advertisement
या सर्व घटकांमुळे हा काढा पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतो. त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारात या काढ्याचा समावेश केल्यास पावसाळ्यातील अनेक आजारांपासून आरोग्याचं रक्षण होऊ शकतं. काढ्यात असलेल्या आरोग्यपयोगी घटकांमुळे श्वसनसंस्थेचं कार्य सुरळीत राहतं. तसंच पावसाळ्यात बाहेरचे, उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यास, अशुद्ध पाणी पोटात गेल्यास पोट बिघडू शकतं. या काढ्यामुळे पचनशक्ती सुधारते. पोटातील गॅस, अपचन आणि इतर पचनासंबंधित तक्रारींवर आराम मिळतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काढ्यामुळे आपलं संसर्गजन्य आजारांपासून रक्षण होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 12, 2024 4:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Immunity Booster Kadha: पावसाळ्यात हा काढा प्यायल्यानं अनेक संसर्गजन्य आजारांपासून होईल रक्षण