दीड लिटर रक्तस्राव, गर्भवतीची मृत्यूशी झुंज, शेवटी डॉक्टरांनी निर्णय घेतला, 30 मिनिटांत...
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: या अवस्थेत सिझर शस्त्रक्रिया करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
छत्रपती संभाजीनगर: मृत्यूशी थेट झुंज देणारी 30 वर्षीय गर्भवती महिला, शरीरातील हिमोग्लोबिन केवळ 4 ग्रॅम/डेसिलिटर आणि सुमारे दीड लिटर रक्तस्राव झालेली अवस्था, अशा अत्यंत गंभीर परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा रुग्णालय (मिनी घाटी) मधील डॉक्टरांनी वैद्यकीय कौशल्याचे दर्शन घडवत माता आणि नवजात बाळाचे प्राण वाचवले.
जालना जिल्ह्यातील ही 30 वर्षीय गर्भवती महिला घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना, नातेवाइकांनी जालना रोडवरील छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयात (मिनी घाटी) ॲम्ब्युलन्स वळवली. रुग्णालयात दाखल होताना तिच्या शरीरातून सुमारे दीड लिटर रक्त वाहून गेले होते. हिमोग्लोबिन केवळ 4 ग्रॅम/डेसिलिटर असल्याने तिची प्रकृती अत्यंत नाजूक बनली होती.
या अवस्थेत सिझर शस्त्रक्रिया करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. प्रसूतीपूर्वी गर्भाशयाचे मुख केवळ 2 सेंमी उघडले होते, जे नैसर्गिकरित्या 10 सेंमी होण्यासाठी साधारण 10 ते 12 तासांचा कालावधी लागतो. मात्र, महिलेची स्थिती पाहता एवढा वेळ उपलब्ध नव्हता.
advertisement
वेळेची निकड लक्षात घेऊन डॉक्टरांनी इंडक्शन लेबर या विशेष वैद्यकीय तंत्राचा वापर करण्याचा अत्यंत कठीण निर्णय घेतला. औषधोपचारांच्या सहाय्याने प्रसूती प्रक्रिया वेगवान करण्यात आली आणि अवघ्या 30 मिनिटांत नैसर्गिक प्रसूती यशस्वीरीत्या पार पडली. या वेळी आई आणि बाळ दोघांचेही प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.
advertisement
“हिमोग्लोबिन अवघे 4 ग्रॅम/डेसिलिटर असताना सिझर करणे शक्य नव्हते. त्यामुळे तातडीने रक्त देत इंडक्शन लेबरचा अत्यंत कठीण निर्णय घेतला. सामान्यतः दर तासाला 1 सेंमी उघडणारे गर्भाशयाचे मुख औषधांच्या साहाय्याने वेगाने उघडले. योग्य वेळी निर्णय घेतल्यामुळे माता आणि बाळाचे प्राण वाचू शकले,” असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी सांगितले.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 11:30 AM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
दीड लिटर रक्तस्राव, गर्भवतीची मृत्यूशी झुंज, शेवटी डॉक्टरांनी निर्णय घेतला, 30 मिनिटांत...











