Video : रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी एकत्र आली तरुणाई, काम पाहून वाटेल अभिमान
- Published by:News18 Marathi
Last Updated:
वर्ध्यातील शेकडो तरुण एकत्र येत रुग्णांना नवजीवन देतायेत. पाहा कोरोना काळात कशी झाली सुरवात?
वर्धा, 6 सप्टेंबर: रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं. अनेकजण स्वेच्छेनं पुढं येऊन रक्तदान करत असतात. पण कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवू लागला होता. तेव्हा वर्धा जिल्ह्यात एक अनोखा रक्तदात्यांच्या ग्रुप तयार झाला. येथील तरुणांनी एकत्र येत शहीद भगतसिंग ब्लड डोनर ग्रुप तयार केला. या ग्रुपच्या माध्यमातून वर्ध्यात रक्तदानाची चळवळ सुरू झाली असून त्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळत आहे.
कशी झाली सुरुवात?
वर्धा जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी इतर जिल्ह्यातूनही रुग्ण येत असतात. या रुग्णांना बऱ्याच वेळा रक्ताची आवश्यकता निर्माण होते. तेव्हा अचानक रक्त मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत वर्ध्यातील काही तरुण गरजू रूग्णांना रक्तदान करून जीवनदान देण्याचं काम करत आहेत. त्यासाठी त्यांनी एक ग्रुपच तयार केला आहे. या वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी एकत्र येत या शहीद भगतसिंग ब्लड डोनर ग्रुपची निर्मिती केली.
advertisement
500 रक्तदाते झाले पूर्ण
वर्ध्यातील या रक्तदानाच्या चळवळीत अनेक तरण जोडले जात आहेत. अनेक तरुणांनी 3 महिन्यातबन एक वेळा तर काही तरुणींनी वर्षातून 3 वेळा रक्तदान केले. कोरोना संकटापासून आजपर्यंत संघटनेचे 500 रक्तदाते पूर्ण झाले आहेत. त्यामुळे शेकडो रुग्णांना जीवनदान मिळालेय. त्या माध्यमातून रक्तदानाची चळवळ सुरू झाल्याचे ग्रुपचे संस्थापक नीरज बुटे यांनी सांगितले.
advertisement
रक्तदान करण्यासाठी जनजागृती
आजारपण, शस्त्रक्रिया, अपघात, सिकल सेल अशा आजारांनी ग्रस्त असलेल्यांना रक्ताची प्रचंड आवश्यकता असते. अशा रुग्णांना रक्तपेढ्यांमधून रक्ताचा पुरवठा केला जातो. मात्र काही रुग्णांना रक्तदात्यांच्या शरिरातील ताज्या रक्ताची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत रक्तदात्यांनी तयार केलेल्या साळखीच्या माध्यमातून ते तात्काळ गरजूला रक्त उपलब्ध करुन दिले जात आहे. त्यासाठी गरज पडल्यास ग्रामीण भागातून तातडीने तरुण येतात आणि रक्तदान करतात. आपल्या परिसरातील मित्रमंडळींसह नागरिक, नातेवाईकांना तसेच शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन मित्रांना रक्तदानाचे महत्त्व पटवून देत त्यांना रक्तदान करण्यासाठी हे तरुण प्रेरित करीत आहेत.
advertisement
रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाने केला गौरव
या तरुणांचे कार्य बघून रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनातर्फे संघटनेचा गौरवही करण्यात आला. तरुणांची ही सेवा अद्यापही अविरत सुरु आहे. तसेच यापुढेही सुरू असेल. शहीद भगतसिंग ब्लड डोनर ग्रुप, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे सर्व शेकडो रक्तदात्यांचे यासाठी मोलाचे योगदान आहे, असे नीरज बुटे सांगतात.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
Sep 06, 2023 11:19 AM IST





