भावासाठी स्वतःच्या शरीराचा भाग कापून दिला; पुण्याच्या या रक्षाबंधनाची राज्यभरात चर्चा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
भावाचा जीव वाचवण्यासाठी पुण्यातल्या एका बहिणीनं स्वत:च्या जीवाचीही पर्वा केली नाही.
पुणे, 29 ऑगस्ट : राखीपौर्णिमा ही केवळ राखी बांधण्यापूरती सीमित नसते, तर या राखीतून एकमेकांसाठी कठीण प्रसंगात उभं राहण्याची ताकद मिळत असते. भावाच्या हाताला राखी बांधताना संरक्षण कर असं सांगण्याऐवजी त्याचा हात हातात घेऊन, दादा मी तुझ्यासोबत कायम असेल, अगदी माझ्या जीवाची पर्वा न करता, असं सांगणाऱ्या पुण्याच्या एका बहिणीने खऱ्या अर्थाने राखीपौर्णिमा साजरी केली. पुण्याच्या या 21 वर्षांच्या लेकीनं स्वत:च लिव्हर डोनेट करून आपल्या 17 वर्षांच्या भावाला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं आहे.
संतोष पाटील एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात तर त्यांची पत्नी घरकाम करते. त्यांना दोन मुलं, मोठी मुलगी नंदिनी सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. तर राहुल सध्या दहावीत आहे. फार गरीबी नसली तरी कुटुंब जेमतेम आपली गुजराण करीत होतं. त्यांच्यावर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. काही दिवसांपासून राहुलची तब्येत खालावत चालली होती. त्या दिवशी तर त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या. मुलाची ही अवस्था पाहून कुटुंब घाबरलं. डॉक्टरांक़डे जाऊनही योग्य ते निदान होत नव्हतं. शेवटी त्यांनी नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयात उपचार सुरू केले. राहुलची तपासणी सुरू झाली आणि डॉक्टरांनी असं काही सांगितलं की, पाटील कुटुंबाच्य़ा पायाखालची जमीनचं सरकली.
advertisement
राहुलला ऑटोइम्युन लिव्हर सायरोसिसची लागण झाली होती आणि त्याला तातडीने लिव्हर ट्रान्सप्लान्टची गरज होती. ऑटोइम्युन लिव्हर सायरोसिसचं निदान लवकर झालं तर त्यावर औषधांनी उपचार करता येऊ शकतो. मात्र राहुलच्या बाबतीत आजाराचं निदान उशीरा झाल्याचं, मेडिकव्हर रुग्णालयाचे डॉक्टर विक्रम राऊत यांनी सांगितलं.
advertisement
भावाला वाचवायला नंदिनी राहिली उभी
डॉक्टरांनी ट्रान्सप्लान्टचा सल्ला दिल्यानंतर कुटुंबाची धावपळ सुरू झाली. सुरुवातील राहुलच्या आईची तपासणी करण्यात आली. मात्र काही वैद्यकीय कारणामुळे त्यांचं लिव्हर नाकारण्यात आलं. त्याचवेळी राहुलची 21 वर्षांची बहिण नंदिनी पुढे आली. सुदैवाने नंदिनी लिव्हर डोनेट करण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या फिट होती.
advertisement
...पण पैशांचं काय?
नंदिनी तर राहुलच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती. मात्र ट्रान्सप्लान्टसाठी मोठा खर्च लागतो. अशावेळी राहुलच्या ऑपरेशनसाठी पैसे उभे करणं हे पाटील कुटुंबासाठी मोठं आव्हान होतं. अशावेळी रुग्णालयाकडून मोठी मदत झाली. याशिवाय अनेक सामाजिक संस्थाही पुढे सरसावल्या.
खरी राखीपौर्णिमा...
माझा भाऊ माझ्यासाठी जग आहे. यंदाच्या राखीपौर्णिमेला मी त्याला सर्वात मौल्यवान गिफ्ट देऊ शकले याचा मला आनंद आहे, अशा शब्दात नंदिनीने आपली भावना व्यक्त केली. 26 जून 2023 मध्ये नंदिनीने आपल्या भावाला नवीन जीवन देऊ केलं. याचा परिणाम म्हणून राहुलने आपली बहिण नंदिनीला राखी बांधली आणि वेगळ्या पद्धतीनं राखीपौर्णिमेचा सण साजरा केला.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 29, 2023 9:26 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
भावासाठी स्वतःच्या शरीराचा भाग कापून दिला; पुण्याच्या या रक्षाबंधनाची राज्यभरात चर्चा