आरोग्याचे छोटे शिलेदार! किचनमधील 'या' 5 बिया आहेत 'सुपरफूड', मन-मेंदू अन् हाडं होतील मजबूत
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
आपण रोजच्या जेवणात पोळी, भाजी, डाळ-भात, कडधान्ये, फळे आणि सुका मेवा अशा अनेक पौष्टिक पदार्थांचा समावेश करतो. पण थांबा, तुमच्या ताटातला एक छोटा पण...
Seeds Benefits : आपण रोजच्या जेवणात पोळी, भाजी, डाळ-भात, कडधान्ये, फळे आणि सुका मेवा अशा अनेक पौष्टिक पदार्थांचा समावेश करतो. पण थांबा, तुमच्या ताटातला एक छोटा पण शक्तिशाली पदार्थ तुम्ही विसरत तर नाही ना? तो म्हणजे 'बिया'! दिसण्यास अगदी लहान असलेल्या या बिया म्हणजे आरोग्याचा खजिना आहेत. जर तुम्ही अजूनही त्यांचा आहारात समावेश केला नसेल, तर हीच योग्य वेळ आहे.
प्रसिद्ध पचनक्रिया तज्ज्ञ (Gastroenterologist) डॉ. पाल मणिकम यांनी या छोट्या बियांचे मोठे फायदे सांगितले आहेत. त्यांच्या मते, अशा 5 खास बिया आहेत, ज्यांचे नियमित सेवन केल्यास आपले आरोग्य कमालीचे सुधारू शकते. चला तर मग, जाणून घेऊया या 'पॉवर-पॅक्ड' बियांमागचे रहस्य.
भोपळ्याच्या बिया : शांत झोप आणि निरोगी हृदयासाठी
दिवसभराच्या धावपळीने येणारा ताण, थकवा आणि निद्रानाशाची समस्या तुम्हालाही सतावते का? तर मग भोपळ्याच्या बिया तुमच्यासाठीच आहेत. डॉ. पाल सांगतात की, मूठभर भोपळ्याच्या बियांमधून तुमच्या शरीराला दिवसभरासाठी लागणारे तब्बल 37% मॅग्नेशियम मिळते. हे मॅग्नेशियम स्नायूंना आराम देऊन शांत करते आणि हृदयाची गती स्थिर ठेवण्यास मदत करते. इतकेच नाही, तर यात असलेले 'ट्रिप्टोफॅन' नावाचे अमिनो ॲसिड शांत झोप देणाऱ्या हार्मोन्सची निर्मिती करते.
advertisement
चिया सिड्स: वजन नियंत्रणात ठेवणारा छोटा जादूगार
वजन कमी करण्याच्या प्रवासात चिया सिड्स तुमचा सर्वात चांगला मित्र ठरू शकतात. पाण्यात किंवा दुधात भिजवल्यावर या बिया जेलीसारख्या फुगतात. यामध्ये भरपूर प्रमाणात विद्राव्य फायबर (Soluble Fiber) असते, ज्यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते आणि अतिरिक्त खाणे टाळले जाते. या बिया दिवसभर तुम्हाला ऊर्जावान ठेवतात. तसेच, यात असलेले ओमेगा-3 फॅटी ॲसिड मेंदू आणि हृदयाच्या आरोग्यासाठी वरदान आहे. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
advertisement
कसे खाल? दूध किंवा पाण्यात अर्धा तास भिजवून स्मूदी, ओटमील किंवा दह्यामध्ये मिसळून याचा आस्वाद घ्या.
जवसाच्या बिया : हृदयाच्या आरोग्याचा रक्षक
जवसाच्या बिया (Flax Seeds) ओमेगा-3 फॅटी ॲसिडचा उत्तम स्रोत आहेत, ज्यामुळे त्या थेट तुमच्या हृदयाच्या आरोग्याशी जोडल्या जातात. यामध्ये 'लिग्नान' नावाचे एक खास तत्व असते, ज्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. यामुळे पचनसंस्था सुधारते आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
advertisement
कसे खाल? जवसाच्या बिया अख्ख्या खाल्ल्यास त्या पचायला जड जातात. त्यामुळे नेहमी मिक्सरमध्ये बारीक पूड करून खा. ही पावडर तुम्ही स्मूदी, दही किंवा पोळीच्या पिठात मिसळून वापरू शकता.
सूर्यफुलाच्या बिया : तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे कवच
सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि सेलेनियम मुबलक प्रमाणात आढळतात. व्हिटॅमिन ई एका अँटिऑक्सिडंटप्रमाणे काम करून शरीराच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. तर, सेलेनियम तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करून थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत ठेवते.
advertisement
कसे खाल? या बिया तुम्ही कच्च्या किंवा हलक्या भाजून खाऊ शकता. सॅलड, भाजी, स्मूदी किंवा चटणीमध्ये घालूनही त्या छान लागतात.
तिळाच्या बिया : हाडांच्या मजबुतीसाठी छोटे पण महत्त्वाचे
"तीळगूळ घ्या, गोड बोला," असं आपण म्हणतोच, पण हेच तीळ तुमच्या हाडांसाठीही खूप फायदेशीर आहेत. तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. यातील आरोग्यदायी फॅट्स शरीरातील सूज कमी करतात आणि हृदयाचे आरोग्य जपतात.
advertisement
कसे खाल? भाजी, आमटी, सॅलड, चटणी किंवा स्मूदीमध्ये मिसळून तुम्ही सहजपणे तिळाचे सेवन करू शकता. तर मग, या छोट्या पण गुणकारी बियांपैकी कोणत्या बियांना तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात स्थान देणार आहात?
हे ही वाचा : Diabetes : डायबेटिज एकदा झाला की आयुष्यभर साथ सोडत नाही, हे खरं आहे; डॉक्टर काय सांगतात?
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 1:55 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
आरोग्याचे छोटे शिलेदार! किचनमधील 'या' 5 बिया आहेत 'सुपरफूड', मन-मेंदू अन् हाडं होतील मजबूत