मुंबईतील 'या' ठिकाणी, लग्नासाठी कोणतंही सामान अगदी स्वस्तात करा खरेदी
- Reported by:Pratikesh Patil
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मुंबईत मुंडावळ्या आणि रुखवताच्या वस्तू तसेच पूजेसाठी लागणारे साहित्य कुठे मिळते? आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की मुंबईतील कोणत्या बाजारात स्वस्तात लग्नासाठी लागणारे साहित्य मिळते.
प्रतिकेश पाटील - प्रतिनीधी मुंबई : दिवाळीत तुळशीचे लग्न पार पडल्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात लग्नाचे मुहूर्त असतात. त्याचप्रमाणे लग्नात मोठ्या प्रमाणात कपड्यांसोबत सोन्याची खरेदी केली जाते, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे लग्नातील पूजेसाठी लागणारे साहित्य, मुंडावळे आणि रुखवत. मात्र, सर्वांनाच प्रश्न पडतो की मुंबईत मुंडावळ्या आणि रुखवताच्या वस्तू तसेच पूजेसाठी लागणारे साहित्य कुठे मिळते? आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की मुंबईतील कोणत्या बाजारात स्वस्तात लग्नासाठी लागणारे साहित्य मिळते.
मुंबईतील गोलदेऊळ येथे असणाऱ्या नळ बाजार या मार्केटमध्ये लग्नासाठी, हळदी आणि साखरपुड्यासाठी लागणारे सर्वच साहित्य मिळते. या मार्केटमधील आंबेकर बाशिंगवाले यांच्या दुकानात लग्नात रुखवत सजवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंमध्ये छोटे घर आहे, ज्याची किंमत शंभर रुपयांपासून आहे. याहून मोठ्या साईजचे घर हवे असल्यास त्याची किंमत दीडशे ते दोनशे रुपये आहे. सुपारीपासून बनवलेले नवरा-नवरी भटजी असे रुखवतही येथे 120 रुपयांना उपलब्ध आहे, तसेच बैलगाडी दीडशे ते दोनशे रुपये पर्यंत मिळते. हळदी-मेहंदी साठी लागणारी डिझायनिंग डिश दोनशे रुपयांना आहे.
advertisement
कळस-तांब्या चांदी व पितळमध्ये सजवलेले अडीचशे ते पाचशे रुपये दरात उपलब्ध आहेत. लग्नात हळदीच्या कार्यक्रमासाठी नवरीसाठी लागणारे हळदीचे दाखणे शंभर रुपयांपासून ते पाचशे रुपये पर्यंत आहेत. रंगीबेरंगी अक्षता 80 रुपये प्रति किलो आहे तर चंदन-हळद अडीचशे रुपये पाव आहे. फेट्याची किंमत अडीचशे रुपये असून विविध डिझाईन्समध्ये फेटे मिळतात. साखरपुड्यात मुलीला देण्यासाठी मेकअप बॉक्सही अडीचशे रुपयांना उपलब्ध आहे.
advertisement
लग्नासाठी लागणाऱ्या मुंडावळ्यांची सुरुवात 40 रुपयांपासून आहे. बाशिंगमध्ये 50 ते 100 प्रकारच्या डिझाईन्स आहेत, ज्यांची किंमत दीडशे ते पाचशे रुपयांपर्यंत आहे. लग्नात वापरण्यासाठी खंजीरही येथे फक्त दीडशे रुपयांना मिळतो. जर तुम्ही मुंबईत राहत असाल आणि तुम्हाला स्वस्तात लग्नासाठी लागणारे साहित्य हवे असेल, तर मुंबईतील नळ बाजार मार्केटला नक्की भेट द्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Nov 14, 2024 6:28 PM IST
title=मुंबईत लग्नात पूजेसाठी लागणारे साहित्य कुठे स्वस्तात मिळते 







