खरंच प्रेम आंधळं असतं! जोडीदाराची दृष्टी जाणार हे माहिती असूनही केलं लग्न, आता.., Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
एक दिवस दोघे फिरायला गेल्यानंतर दुचाकीवर जात असताना निकेतला अचानकपणे डोळ्याला अंधारी आली आणि पायाखालची जमीनच सरकली.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : आपल्याकडे एक म्हण आहे की प्रेम हे आंधळ असतं. एकदा माणूस प्रेमात पडला की त्याला चांगलं वाईट किंवा पुढे काय होईल? याची काहीच चिंता नसते. प्रेमात पडलेली माणसं ही एखाद्या व्यक्तीबरोबर प्रेम केलं तर त्याचं फक्त मन बघतात. असंच आंधळं प्रेम हे छत्रपती संभाजीनगर शहरातील पल्लवी दलाल आणि निकेत दलाल यांनी केलं आहे. त्यांची प्रेम कहाणी ही एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखीच आहे.
advertisement
मैत्रीचं रुपांतर झालं प्रेमात
शहरातील नागेश्वरवाडी भागामध्ये पल्लवी आणि निकेत दलाल हे दाम्पत्य राहतं. दोघांचं घर समोरासमोर असल्यामुळे बालपण सोबतच गेलं. निकेत आणि पल्लवी यांनी शहारातील सरस्वती भुवन शाळेमध्ये शिक्षण घेतलं. लहानपणापासूनच दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. कालांतराने याच मैत्रीच रूपांतर प्रेमात झालं. दोघे दरारोज भेटायचे आणि फिरायलाही जात असत.
advertisement
डोळ्याला आली अंधारी
एक दिवस दोघे फिरायला गेल्यानंतर दुचाकीवर जात असताना निकेतला अचानकपणे डोळ्याला अंधारी आली. ते घरी आल्यानंतर तातडीने डॉक्टरांकडे गेले आणि जाऊन डोळ्याची तपासणी केली. तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं की अनिकेतला काचबिंदू झाला आहे. याचं निदान झालं. भविष्यात कधीही निकेतची दृष्टी जाऊ शकते, असं डॉक्टरांनी सांगितलं. दृष्टी जाऊ शकते हे ऐकताच निकेतच्या पायाखालची जमीन सरकली, असं निकेत सांगतो.
advertisement
निकेतपुढे यक्षप्रश्न
भविष्यामध्ये आपली दृष्टी जाईल हे पल्लवीला कसं सांगायचं? हा निकेत पुढे यक्ष प्रश्न होता. ते दोघे नेहमी ज्या ठिकाणी भेटायचे त्याच ठिकाणी भेटले. काचबिंदू झाल्याचं आणि भविष्यामध्ये दृष्टी जाईल याबाबत निकेतनं पल्लवीला कळवलं. पल्लवीसाठी हा मोठा धक्का होता. तेव्हा निकेतने लग्नाचा विचार सोडून देऊ अशी भूमिका घेतली आणि ती पल्लवीला सांगितली.
advertisement
पल्लवीनं केला निश्चय पण..
निकेतबाबत माहिती असलं तरी पल्लवीनं त्याच्याशीच लग्नाचा निश्चय केला. दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचं ठरवलं. पण, त्यांच्या लग्नात दुसरी अडचण अशी होतो की निकेत ब्राह्मण समाजाचा तर पल्लवी मराठा समाजाची होती. आंतरजातीय विवाहाला कुटुंबीय तयार होणार नाहीत, ही मोठी अडचण होती. तरीही पल्लवीनं धाडस करून तिच्या घरी तिच्या आई-वडिलांना सर्व सांगितलं. सुरुवातीला तिचे आई-वडील लग्नासाठी तयार नव्हते. पण पल्लवीने त्यांना समजावून सांगितलं व त्यानंतर आई वडील लग्नासाठी तयार झाले. दोघांनी कुटुंबाच्या आशीर्वादाने आणि साक्षीने 2007 साली लग्न गाठ बांधली.
advertisement
निकेतची दृष्टी गेली
लग्नापूर्वी पल्लवी एका खाजगी बँकेमध्ये नोकरी करत होती. तर निकेत हा नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत होता. दोघांचा सुखाचा संसार चालू असताना 2012 साली निकेतची दृष्टी गेली. दृष्टी गेल्यामुळे निकेत मानसिक रित्या पूर्णपणे खचून गेला होता. त्याला यातून बाहेर काढण्यासाठी पल्लवीने मोलाची साथ दिली. निकेतला स्विमिंग आणि सायकलिंगचा छंद होता. हाच छंद जोपासण्यात पल्लवीने निकेतला मदत केली. मात्र सुरुवातीला अडचणी आल्या. सर्व अडचणी वरती मात करत निकेत यामध्ये परफेक्ट झाला. निकेतने आयर्न मॅन म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली, असं पल्लवी सांगतात.
advertisement
दरम्यान, सध्या पल्लवी नोकरी सोडून स्वतःचा मसाल्यांचा व्यवसाय करतात. तर निकेत शिक्षण विभागात प्रादेशिक विद्या प्राधिकरण विभागामध्ये काम करतात. गेल्या 17 वर्षांपासून दोघांचा सुखी संसार सुरू असून त्यांना एक मुलगाही आहे.
view commentsLocation :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
February 13, 2024 6:41 PM IST
मराठी बातम्या/लव स्टोरी/
खरंच प्रेम आंधळं असतं! जोडीदाराची दृष्टी जाणार हे माहिती असूनही केलं लग्न, आता.., Video

