बीडमध्ये पुन्हा अपहरणकांड! 16 वर्षांच्या मुलीला केलं किडनॅप, विनयभंग करत पाईपने मारहाण
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. इथं एका १६ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. इथं एका १६ वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग करण्यात आला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पाईपने मुलीला मारहाण केली. तसेच घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारू, अशी धमकी देखील आरोपींनी दिली. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या घरात असतानाच तीन अज्ञात आरोपींनी जबरदस्तीने तिला चारचाकी गाडीत बसवले. त्यानंतर, त्यांनी गाडीतच तिचा विनयभंग केला. यानंतर आरोपींनी तिला प्लास्टिकच्या पाईपने मारहाण केली. या घटनेनंतर आरोपींनी घाबरलेल्या मुलीला घडलेला प्रकार कोणालाही सांगितला तर जीवे मारू, अशी धमकी दिली. यानंतर आरोपींनी पीडितेला सोडून दिलं.
घडलेल्या या प्रकारानंतर पीडित मुलीने घाबरून आपल्या कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीयांनी तत्काळ नेकनूर पोलीस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी या गंभीर घटनेची नोंद घेतली असून, तिन्ही आरोपींविरोधात अपहरण, विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपींना लवकरच अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. एकीकडे संतोष देशमुख अपहरण आणि हत्येचं प्रकरण ताजं असताना बीडमध्ये अशाप्रकारे शाळकरी मुलीचं अपहरण केल्याने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
Aug 03, 2025 2:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बीडमध्ये पुन्हा अपहरणकांड! 16 वर्षांच्या मुलीला केलं किडनॅप, विनयभंग करत पाईपने मारहाण









