1 कोटी बक्षीस अन् शेकडो गुन्हे, एकाच वेळी 37 माओवाद्यांनी बंदूक ठेवली खाली, 2 मोठ्या नेत्यांचं सरेंडर!
- Published by:Sachin S
- Reported by:महेश तिवारी
Last Updated:
आत्मसमर्पण करत असताना एके 47, एस एल आर या त्या दोन्ही बंदुकांसह इतर बंदुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या
गडचिरोली : मागील काही दिवसांपासून गडचिरोली आणि नजिकच्या माओवादीग्रस्त भागात आत्मसमर्पण मोहिम राबवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. आता हैदराबाद शहरात तेलंगणाचे पोलीस महासंचालक शिवधर रेड्डी यांच्या समक्ष दोन माओवादी नेत्यांसह 37 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. 37 माओवाद्यांच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी संघटनेला मोठा हादरा बसला आहे.
आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये गेल्या 32 वर्षापासून माओवादी संघटनेत सक्रिय असलेल्या आप्पासी नारायण आणि आझाद या दोन मोठ्या माओवादी नेत्यांचा समावेश आहे. या दोघांवर सगळ्या राज्यात मिळून प्रत्येकी १ कोटी रुपयांचा बक्षीस आहे. हे दोन्ही नेते तेलंगाणा, महाराष्ट्र, तेलंगाणा-छत्तीसगड सीमेवर सक्रिय असायचे. यांच्यासोबत दंडकारण्य झोनल समितीचे काही सदस्य माओवाद्यांच्या विभागीय समितीचे सदस्य एरिया कमिटीचे सदस्य आणि हिडमाच्या बटालियनमध्ये सक्रिय असलेल्या दोन माओवाद्यांचा यात समावेश आहे.
advertisement
हे सगळे माओवादी वेगवेगळ्या हिंसक घटनांमध्ये सहभागी होते. आत्मसमर्पण करत असताना एके 47, एस एल आर या त्या दोन्ही बंदुकांसह इतर बंदुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्या आहेत. मार्च 2026 पर्यंत माओवाद संपुष्टात आणण्याच्या दिशेनं सुरू असलेल्या सुरक्षा दलाच्या प्रयत्नांमध्ये आजचं आत्मसमर्पण मोठा यश मानलं जात आहे.
6 कोटींचं बक्षीस असलेल्या माओवादी हिडमाचं फेक एन्काउंटर?
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी आंध्र प्रदेश पोलिसांच्या चकमकीत देशातला सर्वात मोठा वांटेड माओवादी माडवी हिडमा ठार झाला. छत्तीसगड सीमे लागत असलेल्या आंध्र प्रदेशच्या अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यात सहा कोटी रुपये बक्षीस असलेल्या हिडमाला सुरक्षा दलांनी ठार मारलं होतं. पण, माडवी हिडमाच्या मृत्यूवरून माओवाद्यांच्या केंद्रीय समितीने सुरक्षा दलांवर गंभीर आरोप केले.
advertisement
आंध्र प्रदेश पोलिसांनी खोट्या चकमकीत हिडमाला ठार केल्याचा आरोप माओवाद्यांच्या सर्वोच्च केंद्रीय समितीनं केला. प्रकृतीच्या उपचारासाठी हिडमा काही सहकाऱ्यांसह विजयवाडा शहरात गेला असता त्याची माहिती पोलिसांना पुरवण्यात आली, असा आरोप पत्रकातून करण्यात आला आहे. उपचारासाठी गेलेला हिडमाला त्यानंतर 15 नोव्हेंबरला ताब्यात घेऊन 18 नोव्हेंबरला मारेदुमिल्लीच्या जंगलात खोट्या चकमकीत ठार करण्यात आलं, असा आरोप माओवाद्यांच्या सर्वोच्च केंद्र समितीच्या प्रवक्ता अभयने केलाय.
view commentsLocation :
Hyderabad,Telangana
First Published :
November 22, 2025 5:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
1 कोटी बक्षीस अन् शेकडो गुन्हे, एकाच वेळी 37 माओवाद्यांनी बंदूक ठेवली खाली, 2 मोठ्या नेत्यांचं सरेंडर!


