मुख्यमंत्रिपदाची स्वप्न कसली बघता... पुन्हा मतदारसंघात जाऊन अजित पवारांचा जयंतरावांवर हल्लाबोल
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निशिकांत भोसले- पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ महायुतीच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.
सांगली : एकेकाळचे जवळचे सहकारी परंतु राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कट्टर प्रतिस्पर्धी बनलेले जयंत पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लाबोल करणे सुरूच ठेवले आहे. इस्लामपूर वाळवा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून जयंत पाटील यांनी गेल्या ३५ वर्षात काय काम केले, हे जनतेला सांगावे. ३५ वर्षे राजकारणात आहे पण तालुक्याला साधे बसस्टॉप बांधता आले नाही, निघाले राज्याचे नेतृत्व करायला... अशा शब्दात अजित पवार यांनी जयंत पाटील यांना टीकेचे लक्ष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निशिकांत भोसले- पाटील यांच्या निवडणूक प्रचारार्थ महायुतीच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या सभेत बोलताना त्यांनी जयंत पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. इस्लामपूर वाळवा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निशिकांत भोसले विरुद्ध शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील याच्यांत लढत होत आहे.
advertisement
35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करता, काय विकास केला?
लोकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर नेतृत्वात धमक आणि ताकद लागते. पण दुर्दैवाने आज या परिसरात कुठेही एमआयडीसी नाही. तुम्ही 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहे पण इथली काय अवस्था आहे. इतके वर्षे मंत्री होते, अर्थमंत्री होते, यांनी काय काम केले... 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करता, इथल्या बस स्थानकाची काय अस्वस्था आहे? रस्त्यांची अवस्था बिकट आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली.
advertisement
कशाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्न बघता, आधी लोकांचे प्रश्न सोडवा
चांगली रिकव्हरी असताना देखील ऊसाला भाव दिला जात नाही, नेतृत्व कमी पडत नाही का? आपल्या मोरेश्वर साखर कारखान्याचा ऊसाचा भाव आपण 3636 आणि 3571 रुपये दिला आहे. या भागातल्या शेतकऱ्यांना 3800 रुपये दर मिळायला हवा होता. किती मिळतो तर 3100. मग सहाशे रुपये कुठे गेले? आम्ही देऊ शकतो, तुम्ही का नाही ? असा सवाल करून दिवाळी गोड धोड करून खायची असते. तुमच्या भागातल्या लोकांना तुम्ही दिवाळी साजरी करून देऊ शकत नाही, कशाला गप्पा हाणता आणि मुख्यमंत्रिपदाची स्वप्न बघता. आधी तुमच्या भागातल्या लोकांचे प्रश्न सोडवा, असे अजित पवार म्हणाले.
advertisement
जयंत पाटील तुमच्यापासून तुमचे लोक दूर का गेले?
स्वर्गीय राजारामबापू पाटील यांनी रोपटं लावलेलं. संभाजी पवार यांनी काढलेला कारखाना घेतला, दुसऱ्यांनी काढलेली कारखानदारी तुम्ही कशाला घ्यायला जाता? तुमचं तुम्ही बघा ना... स्पर्धा ही निकोप असली पाहिजे, समाजाला दोन पैसे मिळवून देणारी असली पाहिजे, असे सांगत प्रत्येकाचा सन्मान ठेवला पाहिजे हे आम्हाला यशवंतराव चव्हाण शिकलो आहे. जयंत पाटील तुमच्यापासून तुमचे लोक दूर का गेले? राजाराम बापू पाटील यांच्यापासून काम करणारे लोक आहेत, कशामुळे या गोष्टी होत आहेत, यासाठी आत्मपरीक्षण करा, असा सल्ला अजितपवार यांनी दिला.
advertisement
नेताच काटा काढू लागला तर कार्यकर्त्यांनी निष्ठा कुणावर ठेवायची
view commentsकासेगाव हे राजाराम बापूंचे गाव, पण तिथे आजही पोलीस स्टेशन भाड्याच्या जागेत आहे. तुम्हाला तुमच्या गावाचे पोलीस स्टेशन बांधता येत नाही, आणि तुम्ही राज्याचे नेतृत्व करायला निघालो आहे. तुमच्याकडे राज्याची तिजोरी होती, काय केलं तुम्ही? सूतगिरणी होती ती बंद पडली आणि आता तिथे फक्त प्लॉटिंग सुरू आहे. 2017 मध्ये सांगली जिल्हा परिषद बागणी मतदारसंघात राष्ट्रवादीचे वैभव शिंदे आमच्या विलासरावंचे चिरंजीव यांना उमेदवारी दिली पण त्याठिकाणी अपक्ष उमेदवार दिला आणि वैभव शिंदेचा बाजार उठवला. नेताच काटा काढू लागला तर माणसांनी, कार्यकर्त्यांनी निष्ठा कोणावर ठेवायची? अशी विचारणाही अजित पवार यांनी केली.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
November 09, 2024 6:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुख्यमंत्रिपदाची स्वप्न कसली बघता... पुन्हा मतदारसंघात जाऊन अजित पवारांचा जयंतरावांवर हल्लाबोल


