अजित पवारांच्या ताफ्यातील गाडीने चौघांना उडवलं, महिलेचा दुर्दैवी मृत्यू
- Published by:Ravindra Mane
- Reported by:SURESH JADHAV
Last Updated:
Ajit Pawar convoy Accident: दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
बीड: दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कुसुम विष्णू सुदे (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, सुदे कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रचारसभेसाठी जात असताना घडली दुर्घटना
ही दुर्घटना उपमुख्यमंत्री अजित पवार हे परतूरहून औसा येथे एका प्रचारसभेसाठी जात असताना घडली होती. तेलगाव–धारूर महामार्गावरील धूनकवड फाटा येथे ताफ्यातील अग्निशमन दलाच्या गाडीने विष्णू सुदे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला आणि दुचाकीवरील सुदे पती-पत्नी आणि त्यांच्या दोन लहान मुली रस्त्यावर फेकल्या गेल्या. ताफ्यातील वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत कुसुम सुदे, त्यांचे पती विष्णू दामोदर सुदे (वय ३५), आणि त्यांच्या दोन निष्पाप मुली रागिणी (वय ९) व अक्षरा (वय ६) हे चौघेही गंभीर जखमी झाले होते.
advertisement
स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत जखमींना तातडीने धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, आज (२५ नोव्हेंबर) उपचारादरम्यान गंभीर जखमी झालेल्या कुसुम विष्णू सुदे यांचा मृत्यू झाला. कुसुम सुदे यांच्या निधनाने दोन निष्पाप लहान मुली आईच्या मायेला मुकल्या आहेत. एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
November 25, 2025 12:46 PM IST


