VSR च्या मालकाला VIP ट्रीटमेंट, मॅच बघायचीही केली सोय, रोहित पवारांचा गंभीर आरोप
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Ajit Pawar Plane Crash News Update: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला एक महिन्याहून अधिकचा काळ लोटला आहे. यावरून आता रोहित पवार अधिकच आक्रमक झाले आहेत.
Ajit Pawar Plane Crash News Update: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूला एक महिन्याहून अधिकचा काळ लोटला आहे. अद्याप त्यांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात? याचं उत्तर अद्याप मिळालं नाही. या प्रकरणावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सातत्याने विविध प्रश्न उपस्थित करत आहेत. अजित पवारांच्या विमानाला अपघात नव्हे तर घातपात झाला असावा, असा संशय ते सातत्याने व्यक्त करत आहेत.
याशिवाय ते व्हीएसआर कंपनीवर देखील विविध आरोप करत आहेत. नियमांना धाब्यावर बसवून व्हीएसआर कंपनी भारतात सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही के सिंह यांचा मुलगा रोहित सिंहचा एक व्हिडीओ देखील समोर आणला होता. ज्यात रोहित सिंह पायलट सीटवर बसून झोपा काढताना दिसला होता. या सगळ्या घडामोडीनंतर गुरुवारी व्हीके सिंह यांना सीआयडीने चौकशीसाठी बोलवलं होतं.
advertisement
गुरुवारी व्हीके सिंह यांची तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. अजितदादांच्या विमानाला अपघात झाला की घातपात? या प्रश्नांचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न चौकशीत करण्यात आला. मात्र या चौकशीवर आता रोहित पवार यांनी मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. व्हीके सिंहला सीआयडीकडून व्हिआयपी ट्रीटमेंट देण्यात आल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवारांनी हा आरोप केला.
advertisement
रोहित पवार नक्की काय म्हणाले?
व्हीके सिंह यांच्या चौकशीबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, "काल व्हीएसआर कंपनीचा मालक व्हीके सिंह हा सीआयडीला आला होता, पोलिसांना भेटण्यासाठी आलेल्या माणसाच्या आसपास जर तुम्ही बघितलं तर त्याला बंदूकधारी सिक्युरिटी देखील होती. अकरा-साडेअकरा वाजता व्हीके सिंह सीआयडी कार्यालयात आल्याचं आम्हाला कळालं, अगदी नाष्ट्यापासून जेवणापर्यंत सगळी सोय करण्यात आली होती. आम्हाला असंही समजलं की, संध्याकाळी त्यांना टीव्हीवर क्रिकेट मॅच देखील दाखवली. त्याचबरोबर ते चौकशीसाठी येतानाचे फुटेज आपल्याकडे आहेत. मात्र रात्री जाताना ते कोणत्या गाडीत गेले, लोकांना कळालं नाही. मीडियाशी आणि तिथे असलेल्या लोकांशी बोलल्यावर एवढंच कळालं की, व्हीके सिंगला पोलिसांच्याच काळ्या काचेच्या गाडीतून बाहेर काढण्यात आलं. एवढी व्हिआयपी ट्रीटमेंट एखाद्या क्रिमिनल तपासातील व्यक्तीला दिली जात असेल तर हे फारच दु:खद आहे."
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 11:38 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VSR च्या मालकाला VIP ट्रीटमेंट, मॅच बघायचीही केली सोय, रोहित पवारांचा गंभीर आरोप








