बारामतीत आता सिग्नल यंत्रणा बसणार, अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश

Last Updated:

Ajit Pawar Baramati Daura: अजित पवार यांनी बारामती शहरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली.

अजित पवार बारामती दौरा
अजित पवार बारामती दौरा
बारामती : सार्वजनिक वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्याच्यादृष्टीने शहरातील मुख्य १० ठिकाणी ‘सिग्नल यंत्रणा’ बसवा, चौकाला नावे देण्याची कार्यवाही करण्यासह रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्ते अतिक्रमणमुक्त करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.
अजित पवार यांनी शहरातील तीन हत्ती चौक परिसर आणि ध्वजस्तंभ, गुणवडी चौक येथील शॉपिंग कॉम्प्लेक्स, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थानाच्या सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी पंकज भुसे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी नगरसेवक, ज्येष्ठ नेते किरण गुजर आदी उपस्थित होते.
advertisement

अजित पवार यांच्या महत्त्वाच्या सूचना

नटराज नाट्य कला मंडळाच्या प्रांगणात ३० मीटर उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात येत असून त्यांचे गतीने काम पूर्ण करा. नगर परिषद कार्यालयाच्या शेजारील जागेवर हुतात्मा स्तंभ उभारण्याच्या दृष्टीने कामे करताना स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या ठळक घटनांचा समावेश करावा. परिसरात विद्युत रोषणाई होईल, याबाबत दक्षता घ्यावी. नगर परिषदेच्या मालकीच्या इमारतीचे स्पष्ट नामफलक लावावेत. सेवा रस्त्याची आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करावीत, अशा सूचना अजित पवार यांनी केल्या.
advertisement
जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता सर्व सोयी सुविधांनीयुक्त निवासस्थानाचे बांधकाम करावे. नागरिकांची वर्दळ विचारात घेता गुणवडी चौक येथील व्यापारी संकुलतील फरश्या, रंगरंगोटी, रस्ते आदी कामे गतीने पूर्ण करा, अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या.
शहरात उभारण्यात येणाऱ्या सेंट्रल पार्कच्या समोरील जागेवर महापुरुषांचे पुतळे बसविण्याचे काम करण्यात येणार असून त्याबाबत आराखड्याचे सुधारित सादरीकरण सादर करावे. बारामती बसस्थानक परिसर स्वच्छ करावा. परिसरात अधिक सावली देणारी वृक्षांची लागवड करावी. तालुक्यात विविध विकासकामे सुरु असून ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि गतीने पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे. वाहतूक सुरळीत ठेवण्याच्यादृष्टीने प्रशासनाला सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनीही वाहतूक सुरक्षा विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बारामतीत आता सिग्नल यंत्रणा बसणार, अजित पवार यांचे अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement