'अंतरवालीच्या दंगलीत शरद पवारांचा आमदार', भुजबळाच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
छगन भुजबळांनी मराठा आरक्षणावर भाष्य करताना अंतरवाली सराटीत झालेल्या दंगलीत शरद पवारांच्या आमदाराचा हात असल्याचा गौप्यस्फोट केला.
कॅबिनेट मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी गुरुवारी नागपूरमध्ये एक खळबळजनक वक्तव्य केलं. मराठा आरक्षणावर भाष्य करताना त्यांनी अंतरवाली सराटीत झालेल्या दंगलीत शरद पवारांच्या आमदाराचा हात असल्याचा गौप्यस्फोट केला. अंतरवाली सराटीत पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात शरद पवार गटाच्या एका आमदाराचा हात आहे. या घटनेच्या आदल्या रात्री एक बैठक झाली होती. या बैठकीला शरद पवारांचा आमदार उपस्थित होता. यानंतरच पोलिसांवर हल्ला करण्यात आला. हा नियोजित हल्ला होता, असा खळबळजनक दावा छगन भुजबळांनी केला आहे.
भुजबळांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांच्या वक्तव्यामागची नेमकी त्यांची भूमिका काय आहे, हे मी त्यांना विचारेन, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.
अजित पवार काय म्हणाले?
छगन भुजबळांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, "मला त्यांच्या वक्तव्याबद्दल फारसं माहीत नाही. ते (छगन भुजबळ) उद्या किंवा संध्याकाळी परत येतील. तेव्हा मी त्यांना विचारेन. त्यांनी जो गौप्यस्फोट केला आहे. त्यामागची त्यांची भूमिका काय आहे, त्यांच्याकडे अधिकची काय माहिती आहे, याबद्दल मी त्यांना विचारेन."
advertisement
छगन भुजबळांनी नेमकं काय म्हटलं?
नागपुरात पार पडलेल्या समता परिषदेच्या कार्यक्रमात छगन भुजबळ म्हणाले की, "अंतरवाली सराटीत 83 पोलिसांवर दगडफेक झाली. त्याचा प्लॅन आदल्या रात्री ठरला. त्यावेळेस पवार साहेबांचा एक आमदार त्या बैठकीत सहभागी होता. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना वस्तुस्थिती माहीत असतानाही, शरद पवार त्या ठिकाणी गेले."
खरं तर, अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला होता. त्यामध्ये अनेक महिला तसेच लहान मुलेही जखमी झाले होते. त्यानंतर उपस्थित जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. काही वाहनं जाळली. त्याच घटनेवरून छगन भुजबळांनी थेट पवारांवर निशाणा साधला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2025 9:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'अंतरवालीच्या दंगलीत शरद पवारांचा आमदार', भुजबळाच्या गौप्यस्फोटावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया