Mumbai : विल्सन जिमखान्याचा वाद पेटणार! विरोधानंतरही मैदानाचा ताबा जैन संघटनेला, 'आम्ही गिरगावकर' आक्रमक
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Marathi Vs Jain : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक विल्सन जिमखान्याच्या मैदानावरून सुरू असलेला वाद आता अधिकच पेटण्याची चिन्हे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे गिरगावकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सुमित सावंत, प्रतिनिधी, मुंबई: दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक विल्सन जिमखान्याच्या मैदानावरून सुरू असलेला वाद आता अधिकच पेटण्याची चिन्हे आहेत. 'आम्ही गिरगावकर' संघटनेचा तीव्र विरोध डावलून हे मैदान ३० वर्षांच्या दीर्घ करारावर 'जीतो' (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन) या संघटनेला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे गिरगावकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयानंतर आता हा लढा थेट रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे मराठी विरुद्ध जैन असा संघर्ष पुन्हा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांची घेणार भेट, ठाकरेंनाही साकडं
प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात 'आम्ही गिरगावकर' संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे प्रतिनिधी लवकरच मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हा निर्णय रद्द करण्याची मागणी करणार आहेत. केवळ प्रशासकीय पातळीवरच नव्हे, तर राजकीय पाठबळ मिळवण्यासाठी ही संघटना आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. या दोन्ही नेत्यांनी गिरगावकरांच्या बाजूने उभे राहावे, अशी विनंती संघटनेकडून केली जाणार आहे.
advertisement
रस्त्यावर उतरून आंदोलन करणार
या प्रकरणावर बोलताना आम्ही गिरगावकर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर गिरगावकर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील. ऐतिहासिक वारसा लाभलेले हे मैदान खाजगी संस्थेच्या हाती देण्यास आमचा शेवटपर्यंत विरोध राहील, असे त्यांनी सांगितले.
मराठी-जैन वादाचा नवा अंक?
कबुतरखान्याच्या मुद्यावरून जैन समुदाय आणि मराठी भाषिक आमनेसामने आल्याची स्थिती निर्माण झाली होती. जैन समुदायाच्या आंदोलनानंतर मराठी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर विल्सन जिमखाना मैदानाच्या मुद्यावरून आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झाली आहे. खेळाच्या मैदानावर खेळच खेळले गेले पाहिजेत. त्या जागी धार्मिक शैक्षणिक पाठशाळा चालवण्याचा प्रयत्न क्रीडा संस्कृतीला धक्का देणारा असल्याचा आरोप करण्यात आला होता. हा लढा फक्त मैदानाचा नाही हा आपल्या सांस्कृतिक, क्रीडात्मक अस्तित्वाचा लढा असल्याचे सांगण्यात आले होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 12:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai : विल्सन जिमखान्याचा वाद पेटणार! विरोधानंतरही मैदानाचा ताबा जैन संघटनेला, 'आम्ही गिरगावकर' आक्रमक









