उच्चशिक्षित तरुणाची कमाल! विदर्भात फुलवली जिरॅनियमची शेती; करतोय लाखोंची कमाई
- Published by:News18 Marathi
Last Updated:
विदर्भातील तरुणाने जिरॅनियम शेतीचा प्रयोग केला असून त्याला यामधून लाखोंची कमाई होत आहे.
अमिता शिंदे, प्रतिनिधी
अमरावती : शेती बेभरवशाची असल्याने अनेक शेतकऱ्यांना कित्येक वेळी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा घातलेला खर्चही निघत नाही. मात्र, असे असताना कित्येक उच्चशिक्षित तरुण आज शेतीकडे वळतांना दिसत आहेत. यामध्ये तरुण आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करत आहे. असाच प्रयोग विदर्भातील अमरावती जिल्ह्याच्या वरूड तालुक्यातील शेंदूरजनाघाट येथील यश गणोरकर या 23 वर्षीय तरुणाने केला आहे. यश गणोरकर याने जिरॅनियमच्या शेतीचा प्रयोग केला असून त्याला यामधून लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
शेतीची घेतली माहिती
यश गणोरकर याने एमएससीची (इंडस्ट्रिअल केमिस्ट्री) पदव्युत्तर पदवी घेतलेली आहे. तर मुक्त विद्यापीठातून दूरस्थ शिक्षण पद्धतीने एमबीए (मार्केटिंग) देखील तो करतो आहे. यश गणोरकर याची वडिलोपार्जित 3 एकर शेती आहे. त्याचे वडील शेतीच करतात. संत्रा हेच त्यांचे मुख्य पीक. एकेदिवशी नगर-शिर्डी भागात यशला जिरॅनियमची शेती आणि तेलनिर्मिती युनिट पाहण्यास मिळाले. उत्सुकतेने तेथे जाऊन पाहणी केली. हा प्रयोग आवश्यक वाटल्याने तेथे तो दोन दिवस राहिला देखील. घरी परतल्यावर त्याने या प्रयोगाची संकल्पना वडिलांना सांगितली. मात्र आपल्या भागात हा प्रयोग म्हणजे मोठी जोखीम वाटून वडिलांनी त्यास नकार दिला. पण जिद्दी यशने त्यांना शिर्डी भागात नेत हा प्रयोग प्रत्यक्ष दाखवत त्याचे महत्त्व पटवून दिले.
advertisement
शेतीचा यशस्वी प्रयोग
यशने 40 एकर शेती कराराने करण्यास घेतली आहे. त्यात सुरुवातीला अडीच एकरांत सन 2022 मध्ये जिरॅनियमचा प्रयोग सुरू झाला. नगर जिल्ह्यातील नेवासा येथून सहा रुपये प्रति रोप याप्रमाणे अडीच एकरांसाठी 36 हजार रोपे आणली. गादीवाफे, इनलाइन ठिबक, झिगझॅ’ पद्धतीने चार बाय सव्वा फूट अंतरावर लागवड केली. याची लागवड ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत केली जाते. किडी-रोगांचा प्रादुर्भाव कमी असतो. जिरॅनियमच्या विशिष्ट गंधामुळे वन्यप्राणी त्याकडे फिरकत नाहीत. एकदा लागवड केल्यानंतर तीन वर्षे उत्पादन घेता येते. दर तीन महिन्यांनी एकदा याप्रमाणे वर्षातून चार वेळा कापणी. एकरी 10 ते 12 टन पाला मिळतो.
advertisement
चिया शेतीचेही धाडस
जिरॅनियम शेतीच्या जोडीला यशने चिया शेतीचेही धाडस केले आहे. या चिया बियांचा शोध लागला. तेथील शेतीही त्याने पाहिली. बाजारपेठ आणि दरांचाही अभ्यास केला. तेथूनच बियाणे खरेदी केले. सुरुवातीला पाच एकरांवर लागवड केली. पहिल्या वर्षी चांगला अनुभव आल्यानंतर यंदा क्षेत्र 25 एकरांवर नेले आहे. चिया बियाण्यांचा दर 1500 रुपये प्रति किलो असून, सुमारे साडेतीन महिने कालावधीचे हे पीक आहे.
advertisement
विक्रीसाठी यशस्वी प्रयत्न
जिरॅनियम तेल सुगंधी आणि औषधी असल्याने त्यास औद्योगिक, औषधी, सौंदर्यप्रसाधने, परफ्युम आदीं उद्योगांमधून मोठी मागणी आहे. त्या दृष्टीने यशने सोशल मीडिया आणि या क्षेत्रात कार्यरत शेतकऱ्यांशी संपर्क साधत जिरॅनियम तेल व्यावसायिकांचे संपर्क मिळविले. त्यांच्याकडून बाजारपेठ आणि बारकावे घेतले. दरम्यान,1939 पासून या तेलाच्या व्यवसायात असलेल्या मुंबईतील एका कंपनीला यश तेलाचा पुरवठा करतो आहे. त्यास 12 हजार रुपये प्रति लिटर दर मिळतो आहे. यातून लाखोंची कमाई होत आहे.
Location :
Amravati,Amravati,Maharashtra
First Published :
January 15, 2024 1:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
उच्चशिक्षित तरुणाची कमाल! विदर्भात फुलवली जिरॅनियमची शेती; करतोय लाखोंची कमाई