Independence Day 2025: स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही महाराष्ट्रातील या गावात आजही कुणाकडे भारतीय म्हणून नाही ओळख!
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Independence Day 2025: मेळघाटात वास्तव्याला असलेले अनेक आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यांच्याकडे आधार कार्ड नाही. त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होते.
अमरावती: 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं. येत्या 15 ऑगस्ट 2025 रोजी आपण देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. 1947 पासून आतापर्यंत अनेक बदल घडले. देशाच्या अनेक भागांचा भरपूर विकासही झाला. मात्र, देशातील काही घटक अजूनही मूलभूत सोई सुविधांपासून वंचित असल्याचं बघायला मिळतं. अमरावती जिल्ह्यांतील मेळघाटात अनेक आदिवासी बांधवांचं वास्तव्य आहेत. मेळघाट नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असला तरी सोई सुविधांचा मात्र, तिथे अभाव आहे. काही आदिवासींकडे सद्यस्थितीमध्ये सर्वात आवश्यक असणारं आधार कार्ड देखील नाही. त्यामुळे त्यांना विविध सुविधांचा लाभ मिळत नाही.
आधार कार्डच नाही
मेळघाटात वास्तव्याला असलेले अनेक आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यांच्याकडे आधार कार्ड नाही. त्यामुळे त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होते. मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ या गावच्या सरपंच ललिता बेठेकर यांनी याबाबत लोकल18 शी चर्चा केली. सरपंच म्हणाल्या, " मेळघाटमधील अनेक गावं अशी आहेत जिथं अद्याप मुलभूत सुविधा देखील पोहचलेल्या नाहीत. अनेक आदिवासींकडे आधार कार्ड नाहीत. जेव्हा आधार कार्ड काढण्यासाठी अभियान राबवलं होतं तेव्हा अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. काही लोकांकडे आवश्यक ती कागदपत्रं नाहीत. त्यांच्याकडे जन्माचा दाखला देखील नाही."
advertisement
आधार कार्ड न मिळण्याची कारणे
आधार कार्ड काढण्यासाठी जन्माचा दाखला आवश्यक आहे. अनेक आदिवासींकडे हा दाखलाच नाही. शिक्षित नसल्याने त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखलासुद्धा नाही. अनेकजणांचे फिंगरप्रिंट आणि आयस्कॅन होत नाहीत. याला एक पर्याय म्हणून न्यायालयीन प्रक्रिया आहे. त्यासाठी 5 हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे लागतात. त्यातही आधार कार्ड मिळेल की, नाही याची गॅरंटी नसते. शिक्षणाचा अभाव असल्याने अनेक बाबी या लोकांना कळत नाही. त्यामुळे फसवणूक सुद्धा होते.
advertisement
सेतू केंद्राकडून आर्थिक लूट
आधार कार्ड असल्यास सरकारच्या अनेक सुविधा मिळतात. मुलांना शाळेत नवनवीन संधी देखील मिळतात. त्यामुळे अनेकजण आधार कार्ड निघावं यासाठी धडपड करतात. मिळेल त्या सेतु केंद्रात जातात, मागेल ते पैसे देतात आणि घरी येतात. अनेकदा पैसे खर्च करून देखील आधार कार्ड मिळत नाही. शिक्षण आणि सुविधांचा अभाव असल्याने ही समस्या जास्तच वाढलेली दिसते.
advertisement
आधार कार्ड नसल्याने सुविधा नाही
मेळघाटामधील ज्या आदिवासी बांधवांकडे आधार कार्ड नाही, त्यांना सुविधा मिळत नाहीत. विशेषत: शाळकरी मुलांचा सर्वात जास्त तोटा होतो. आधार कार्ड नसल्याने विद्यार्थ्यांची बँक खाती सुरू करता येत नाहीत परिणामी त्यांना सरकारकडून मिळणारी शिष्यवृत्ती आणि इतर लाभ मिळत नाहीत. शेतकरी वर्गला देखील पिक विमा किंवा शेतीच्या इतर नुकसानीचा निधी मिळत नाही. आधार कार्ड नसल्याने गरोदर स्त्रियांना देखील शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. यासाठी शासनाने मदत करावी. यावर उपाय सुचवावेत, अशी मागणी सरपंच ललिता बेठेकर यांनी केली आहे.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
August 14, 2025 5:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अमरावती/
Independence Day 2025: स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतरही महाराष्ट्रातील या गावात आजही कुणाकडे भारतीय म्हणून नाही ओळख!