'आम्हाला मरायची परवानगी द्या', API अश्विनी बिद्रेंच्या पतीसह मुलीची थेट राष्ट्रपतींकडे मागणी, कारण काय?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यांची अनैतिक संबंधातून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीच हत्या केल्याचं तपासात समोर आलं होतं.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. ११ एप्रिल २०१६ रोजी त्या अचानक बेपत्ता झाल्या होत्या. पुढे त्यांची अनैतिक संबंधातून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनीच हत्या केल्याचं तपासात समोर आलं होतं. या प्रकरणात तब्बल ८ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर मे २०२५ मध्ये अलिबाग न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मात्र अजूनही पोलीसांच्या नोंदींमध्ये अश्विनी बिद्रे बेपत्ता असल्याची नोंद आहे. या प्रकरणी आता अश्विनी बिद्रेचे पती राजू गोरे यांनी थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केली आहे.
अश्विनी बिद्रे खून प्रकरणात कोर्टाकडून मृत्यूची घोषणा करण्यात आली. या घटनेला दहा महिन्यांचा कालावधी उलटला आहे. तरीही पोलिसांत अश्विनी बिद्रे बेपत्ता असल्याचीच नोंद आहे. अश्विनी बिद्रे यांचा मृत्यू अमान्य असेल तर आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. मुलगी आणि पतीने राष्ट्रपतींकडे ही मागणी केली आहे. पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रेच्या हत्येची कबुली देखील दिली होती. हत्या होऊन आठ वर्षे उलटली. पनवेल न्यायालयाकडून तीन आरोपींना शिक्षा देखील ठोठावली. पण पोलिसांमध्ये कागदोपत्री मृत्यूची नाही तर बेपत्ता असल्याचीच नोंद आहे. यावरून अश्विनी बिद्रे यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी केली आहे.
advertisement
यावर प्रतिक्रिया देताना अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे म्हणाले, एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत अनास्था वाटते. या सगळ्या गोष्टी करताना शासन दुर्लक्ष करतं. मग हे कायदे आमच्यासाठी नाहीयेत का? सामान्य नागरिकांसाठी नाहीत का? मी कोल्हापुरात याबाबत अर्ज दाखल केला तर ते म्हणतात, हे आमच्या कार्यक्षेत्रात येत नाही. ते प्रकरण मुंबई कार्यक्षेत्रात येतं. मग कुरुंदकरला पॅरोलची रजा औरंगाबाद खंडपीठ कसं काय देतं? ही सगळी यंत्रणा कुरुंदकरसाठी काम करतेय, म्हणून मी राष्ट्रपती आणि सरन्यायाधीशांकडे एक अर्ज दाखल केला आहे. मला आणि माझ्या मुलीला इच्छा मरण मिळावं, अशी मागणी आम्ही केली आहे.
advertisement
अश्विनी बिद्रे प्रकरण काय आहे?
अश्विनी बिद्रे या नवी मुंबईत 'साहाय्यक पोलीस निरीक्षक' (API) म्हणून कार्यरत होत्या. ११ एप्रिल २०१६ रोजी त्या अचानक बेपत्ता झाल्या. सुरुवातीला त्या स्वतःहून कोठेतरी निघून गेल्या असाव्यात, असं म्हटलं जात होतं. मात्र पुढे त्यांची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं समोर आलं. ही हत्या दुसरं तिसरं कुणी नव्हे तर पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर आणि त्याच्या साथीदारांनी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं.
advertisement
हत्येचे कारण
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे आणि पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यात अनैतिक संबंध सुरू होते. दोघेही विवाहित होते, असं असताना अश्विनी बिद्रे यांनी कुरुंदकरकडे लग्नाचा तगादा लावला होता. ही गोष्ट कुरुंदकरला मान्य नव्हती, त्यातूनच त्याने बिद्रे यांचा काटा काढण्याचे ठरवले. ११ एप्रिल २०१६ रोजी भाईंदर येथील स्वतःच्या घरी कुरुंदकर आणि त्याच्या साथीदारांनी अश्विनी बिद्रे यांची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे कटरने तुकडे करून ते लोखंडी पेटीत भरले आणि वसईच्या खाडीत फेकून दिले. अश्विनी बिद्रे यांचा मृतदेह पोलिसांना कधीच सापडला नाही.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 1:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'आम्हाला मरायची परवानगी द्या', API अश्विनी बिद्रेंच्या पतीसह मुलीची थेट राष्ट्रपतींकडे मागणी, कारण काय?








