Chhatrapati Sambhajinagar Crime : कोर्टात नोंदणी, लग्नाची लगबग... पण त्या एका क्षणाने होत्याचं नव्हतं केलं; छत्रपती संभाजीनगरमधली हादरवणारी घटना
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar : तरुणींनी लग्नाच्या बनावट कोर्ट मॅरेजच्या बहाण्याने शेतकरी कुटुंबाची 3.86 लाखांची फसवणूक केली. शेतकरी कुटुंबाची निष्ठा वापरून केलेल्या या फसवणुकीची पोलिस तपास सुरू असून गुन्हा नोंदवला आहे.
छत्रपती संभाजीनगर : आपल्या आयुष्यभराचा जोडीदार चांगला हवा. सर्व कुटुंबास सांभाळून घेणारा असावा योग्य जोडीदार मिळावा अशी प्रत्येक तरुणाची इच्छा असते आणि हीच इच्छा मनात ठेवून योग्य जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करत असताना एका शेतकरी तरुणाची फसवणूक झाली आहे. कोर्ट मॅरेजच्या नावाखाली बनावट लग्न लावून तीन महिलांनी या कुटुंबाकडून तब्बल 3 लाख 86 हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार 24 सप्टेंबर रोजी सिडको एन-6 परिसरात उघडकीस आला असून या प्रकरणात तीन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी महिलांची नावे ज्योती राजू गायकवाड (बनावट नाव – ज्योती मिसाळ, रा. हर्षनगर, छत्रपती संभाजीनगर), माया मधुकर शिंदे आणि सविता मधुकर शिंदे (दोघी रा. दुसरबीड, ता. सिंदखेडराजा, जि. बुलडाणा) अशी आहेत. फिर्यादी हे नाशिक जिल्ह्यातील असून ते पत्नी व दोन मुलांसह शेती करून उदरनिर्वाह करतात.
त्यांचा मुलगा दीपक (नाव बदललेले) यासाठी योग्य मुलगी शोधण्याचे प्रयत्न सुरू असताना त्यांच्या शेतात काम करणाऱ्या सीमाने ओळखीतील मुलगी सुचवली. फोटो आणि माहिती पाहून मुलगी पसंत आल्याने कुटुंब 23 सप्टेंबर रोजी सिडको परिसरातील ज्योती गायकवाड हिच्या घरी गेले. तिथे ज्योती, रेखा मिसाळ आणि माया शिंदे उपस्थित होत्या. आरोपींनी मुलीच्या आईच्या आजारपणाचा मुद्दा काढत, उपचार आणि दागिन्यांसाठी 1 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली.कोर्ट मॅरेजद्वारे लग्न करण्याचे ठरवण्यात आले. आरोपींनी वकिलाला पाच हजार रुपये पाठवायला सांगितले. त्यानंतर रोख, फोनपे आणि मित्रामार्फत एकूण 3.86 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने अशा स्वरूपात शेतकऱ्यांनी रक्कम दिली.
advertisement
24 सप्टेंबर रोजी सर्व मंडळी कोर्ट मॅरेजसाठी जिल्हा न्यायालयात पोहोचली. तलवार नावाच्या वकिलाने कागदपत्रे घेतली आणि फी म्हणून 12 हजार रुपये घेतले. त्यानंतर मुलगी माया हिच्यासोबत सर्वजण गावाकडे निघाले, मात्र काही अंतरावरच ती एका स्कॉर्पिओ गाडीत बसून फरार झाली.घटनेनंतर बदनामीच्या भीतीने शेतकऱ्याने सुरुवातीला मौन बाळगले. काही दिवसांनंतर हीच टोळी कोपरगावात पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ओळख पटवली आणि तक्रार नोंदवली.
advertisement
सिडको पोलिसांनी 18 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.लग्नाच्या नावाखाली फसवणुकीचे वाढते प्रकार पाहता, पोलिसांनी नागरिकांना अशा आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 20, 2025 8:40 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/औरंगाबाद/
Chhatrapati Sambhajinagar Crime : कोर्टात नोंदणी, लग्नाची लगबग... पण त्या एका क्षणाने होत्याचं नव्हतं केलं; छत्रपती संभाजीनगरमधली हादरवणारी घटना










